शहापूर पोलीस स्थानक कार्यक्षेत्रातील 80 गणेश मंडळां पैकी पोलीस खात्याच्या सर्व अटी पाळून बसवेश्वर चौक येथील गणेश मंडळाने पोलीस स्थानकाचा विधायक गणेश मंडळ पुरस्कार मिळवला आहे.बुधवारी सायंकाळी शहापूर पोलीस स्थानकात झालेल्या कार्यक्रमात पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांनी या मंडळास विधायक गणेश मंडळाचा पुरस्कार देत दहा हजारांचे रोख बक्षिस दिले.
यावेळी मार्केट ए सी पी एन व्ही भरमनी,पोलीस निरीक्षक जावेद मुशाफिरी,नगरसेवक रमेश सोंटकी,दिपक जमखंडी, संजय सव्वाशेरी, माजी नगरसेवक नेताजी जाधव,काँग्रेस नेते जयराज हलगेकर मुस्लिम समाजाचे नेते उपस्थित होते.
सुरुवातीला पोलीस निरीक्षक जावेद मुशाफिरी यांनी शहापूर भागात गणेश उत्सव आणि मोहरम दोन्ही सण शांततेत साजरे केल्याचे श्रेय दोन्ही समाजाच्या शांतता समिती पंच कमिटी आणि युवकांना दिले.विधायक गणेश मंडळ निवडण्यासाठी आपण पाच कोणत्या अटी दिल्या होत्या त्याचे वर्णन करत खासबाग बसवेश्वर सर्कल येथील मंडळ कसं उत्कृष्ट मंडळ ठरलं याची माहिती दिली.यावेळी दोन्ही सण शांततेत साजरे केल्यानें विष्णू गल्ली मुस्लिम पंच कमिटीच्या वतीनं पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार झाला.
पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांनी जाती धर्म भेदभाव न बाळगता निरीक्षक जावेद यांनी स्वतः गणपती मूर्ती आणली सत्य नारायण पूजा केली याचा परिणाम शहापूर भागात झाला त्यामुळेच उत्सव शांततेत पार पडला असल्याचे म्हटले.माजी नगरसेवक नेताजी जाधव यांनी विधायक गणेश मंडळ निवडण्याची स्पर्धा कायम सुरू राहावी अशी मागणी करत पोलीस निरीक्षक जावेद यांच्या कार्याचे कौतुक केले.