लक्ष्मी हेब्बाळकर आणि जारकीहोळी ब्रदर्स यांच्या वादात सरकार अडचणीत येऊ नये म्हणून कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष माजी मंत्री ईश्वर खांडरे बेळगावला आले आहेत.त्यांनी दोन गटातील वाद मिटवून समझोता केला आहे. या समझोत्यामध्ये नावे आम्ही सांगू तोच अध्यक्ष ही अट घालून काम झाले त्यांमुळे आता वादही मिटेल आणि संघर्षही शमेल अशी शक्यता आहे.
निर्माण झालेला वाद निवडणुकीपूर्वी मिटवून सरकार वाचवण्याचे काम खांडरेकडे देण्यात आले होते.
आज सकाळी सर्वप्रथम खांडरे हे कुवेंपु नगर येथील लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या निवासस्थानी पोहोचले. तेथे त्यांनी त्या ९ सदस्यांनाही बोलावून घेतले. ५ जण समितीचे आणि ४ जण काँग्रेसचे असे मिळून असलेल्या या गटाशी त्यांनी चर्चा केली. आपल्या मतदारसंघातील सदस्य आठ आहेत आणि यमकनमर्डी मतदारसंघातील सदस्य सहा आहेत. त्यापैकी एकजण सुद्धा माझाच झाला आहे तेंव्हा लिंगायत माणूस अध्यक्ष करणार ही भूमिका घेऊन आपल्या मतावर लक्ष्मी आक्का अडून बसल्या होत्या.
ही चर्चा संपवून ते जारकीहोळी ब्रदर्स ची भेट घेण्यास गेले. सर्किट हाऊस येथे जाऊन त्यांनी सतीश जारकीहोळी यांची भेट घेतली. तसेच उर्वरित ५ सदस्यीय गटाशीही चर्चा करण्यात आली. त्यावेळी जारकीहोळी यांनी आपण लिंगायत अध्यक्ष करण्याच्या विरोधात आहोत. बेळगाव तालुक्यावर मराठा समाजाचे वर्चस्व आहे. म्हणून मराठा अध्यक्ष होत असेल तरच आपण समझोत्यासाठी तयार आहे अशी भूमिका घेण्यात आली.
ईश्वर खांडरे हे कर्नाटक काँग्रेस मधील समझोता मास्टर म्हणून ओळखले जातात. त्यांनी यापूर्वीही मोठे मोठे वाद आणि पेच मिटवले आहेत. त्यांनी पक्षश्रेष्टी तसेच दिनेश गुंडुराव यांच्याशी चर्चा करून दोन्हीही गटांनी अर्ज करू नका आम्ही सांगतो त्यांची बिनविरोध निवड होईल असा तोडगा काढला, तो दोन्ही गटांनी मान्य केल्यावर अध्यक्ष पदासाठी महादेव पाटील आणि उपाध्यक्ष पदासाठी बापूसाहेब जमादार यांची निवड जाहीर करून त्यांना अर्ज करण्याची सूचना करण्यात आली.
काँग्रेसला कर्नाटकातील सरकार वाचवणे आवश्यक आहे, त्यासाठी कोणतीही चूक चालणार नाही. तेंव्हा आपल्या गटाचा अध्यक्ष हा आक्काचा हट्ट पूर्ण झाला. लिंगायत नको हा जारकीहोळीचा हट्टही पूर्ण झाला आणि आता बहुतेक सतीश जारकीहोळी यांना महिन्याभरात एक चांगले मंत्रीपदही मिळणार आहे.