मी अगदी लहानपणापासूनच पंढरपूरची वारी पाहतेय.कधीतरी आपणही या वारीत सहभागी व्हावं अशी इच्छा व्हायची.पण मी तसा कधी प्रयत्न नाही केला. पण मला या वारीबद्धल प्रचंड उत्सुकता आणि वारकरी लोकांचा आदर आहे. आपलं सर्वस्व देवाला दिलं की देवावरच भक्तीचं कर्ज चढतं . भक्तांचा चरीतार्थ चालवण्यासाठी देवांचाही देव येतो हे सत्यच वाटतं.पुष्कळ वाचुन जरी आपण शहाणे झालो असलो व आपल्याला पृथ्वीवरचं सर्व ज्ञान असलं तरी ते आपण मेल्यावर काहीच उपयोगाचं नसतं. वारक-याकडे ते ज्ञान असतं जे मेल्यानंतरच्या प्रवासाला शिदोरीसारखं पुरणार तर असतंच पण आत्ता या घडीलाही तो समाधानाने जगत असतो जे समाधान आपल्याकडे सर्व काही असुनही क्वचितच आढळेल.
पायी वारी चाललो की अंदाज येतो. कि या वारक-याकडे किती विश्वास आजही आहे विठुरायावर. पंढरपूरला या साठी जायचं असतं की भक्ती डोळ्यात व आचरणात कशी दिसते ते पहाता अनुभवता येतं. म्हणूनच पांडुरंग आपली सर्वांची तिथे वाट पहात असतो की माझा भक्त कधी येईल. पण आपली योग्य वेळ येते तेव्हाच आपण तिथे जाणार. तोपर्यंत आपल्याला पंढरपूर दूरच.
हा सगळा ना नामाचा महिमा आहे. हे नाम तिकडे मिळतं भक्तीच्या पेठेत. पंढरपुरात. चोविसतास ऐकु येतं. ते ऐकायला व जिवात साठवुन ठेवायला तर लाखो लोक एकत्र जमतात तिथं
मी या वारीबद्धल विचार करत विठुरायाचं स्मरण करत माझं बागकाम करत असते. विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला.विठु राया कुठे आणि कुठल्या स्वरूपात भेटतो हा प्रत्येकाचा वैयक्तिक अनुभव असतो.मलाही असाच अनुभव आला.
माझ्या बागेत फुललेल्या कमळात.
माझ्या बागेत कमळ फुलावं असं फार वाटायचं.कमळ हे फुल चिखलातुन ऊमलतं.कमळ हे देवाला अर्पण करतात.पद्मनयन,पद्मपद असं वर्णनही केलं जातं.मला कमळाचं सौंदर्य खुप सात्विक आणि अध्यात्मिक वाटतं.
कमळ आणी जलं लीली यातला फरक सुद्धा मला गेल्या दोन तीन वर्षांपासूनच स्पष्ट समजायला लागलाय. माझ्या बागेतही कमळ असावं असंच मला वाटायचं. हे कमळ बेळगाव जवळ असलेल्या एका लहानशा खेड्यात असलेल्या तलावातून माझ्या मुलानी मला काढुन दिलं होतं.आणल्यावर त्याची लागवड आणि मग दिवसागणिक त्याची होणारी वाढ अक्षरशः वेड्यासारखी मी पहात होते.आणि साधारण एक महिन्यातपुर्वी मला त्याला एक कळी दिसली
या कळीचं कमळात होणार रुपांतर पाहण्यात मला फार आनंद मिळत होता.आषाढी एकादशीला हे फुललं.
जणु विठुरायाचंच आगमन झालं.
लालन प्रभू-माजी नगरसेविका