बेळगाव बाजार पेठेत सध्या कोबीचा दर गडगडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर मोठे संकट निर्माण झाले आहे. दर नसल्याने शेतातील कोबीवर नांगर फिरविला जात आहे. याचे सोयरसुतक मात्र प्रशासन किंवा व्यापाऱ्यांना नसल्याचेच दिसून येत आहे.
योग्य हमीभाव फक्त उसालाच नको तर प्रत्येक पिकाला हवा अशी मागणी वारंवार होत असते. मात्र हा हमीभाव नेमका कोणत्या पिकाला मिळेल याची शाश्वती नाही. त्यामुळे शेतकरी
पुरता अडचणीत आला आहे.
कमी कामगार आणि अधिक उत्पन्न म्हणून कोबी पीक घेतले जाते. मात्र कोबीचा दर कवडीमोल झाल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे अनेकांच्या शेतात कोबी आहे तसाच पडून आहे.
हमीभाव न देणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला आता जागे करण्यासाठी शेतकरी आक्रमक होण्याची गरज आहे, मात्र कोबी ला भाव नसल्याने शेतकऱ्यांवर कोबीला भाव देता का भाव असे म्हणण्याची वेळ आली आहे.