बेळगाव उत्तर, दक्षिण, ग्रामीण आणि खानापूर अशा चार मतदारसंघात ४० उमेदवार शर्यतीत होते. यापैकी चार निवडून आलेले आणि इतर दोन पडलेले असे सहा जण वगळता ३६ जणांची डिपॉझिटे जप्त झाली आहेत. निवडणुकीत पराभवापेक्षा मोठी हार म्हणजे डिपॉझिट जप्त होणे हीच असते. या ३६ जणांना ही हार जिव्हारी लागणार आहे.
निवडणुकीला अर्ज भरताना लोकप्रतिनिधीत्व कायदा कलम १५८ अन्वये डिपॉझिट भरून घेतले जाते. विधानसभा निवडणूक असल्यास सामान्य जातीतील उमेदवारास १० हजार आणि इतर जातीतील उमेदवारास ५ हजार रुपये डिपॉझिट म्हणून भरावे लागतात. नियमानुसार त्या त्या मतदारसंघातील एकूण मतसंख्येच्या सहाव्या भागापेक्षाही कमी मते पडणाऱ्या व्यक्तीचे डिपॉझिट जप्त करण्यात येते.
या चारही मतदारसंघातील विजयी उमेदवार अभय पाटील (दक्षिण), अनिल बेनके (उत्तर), लक्ष्मी हेब्बाळकर( ग्रामीण ), अंजली निबाळकर( खानापूर) तसेच उत्तर चे पराभूत उमेदवार माजी आमदार फिरोज सेठ व दक्षिण चे पराभूत उमेदवार एम डी लक्ष्मीनारायण हे सहा जण सोडता बाकी कुणालाही डिपॉझिट वाचेल इतकीही मते आली नाहीत.