खेळता खेळता एक अडीच वर्षांचे बाळ खोल विहिरीत कोसळले…… या बाळाला वाचवायचे कसे हा प्रश्न होता….. गटांगळ्या खाऊन आणि पोटात पाणी शिरून ते बाळ १०० फुटी खोल विहिरीत तरंगत होते….. इतक्यात तिथे पोचला ब्रेव्हो निखिल हा तरुण….. स्वतःच्या जीवाची अजिबात काळजी न करता त्याने विहिरीत झेप घेतली आणि त्या बाळाला वाचवले….. चिमुकल्याला जीवदान देणारा तरुण निखिल फक्त १७ वर्षाचा आहे.
निखिल दयानंद जीतूरी असे त्याचे पूर्ण नाव. सिद्धिविनायक मार्ग वझे गल्ली वडगाव चा तो रहिवासी. वसंतराव पोतदार पॉलिटेक्निक चा विध्यार्थी आणि उत्कृष्ट डान्सरही, यापेक्षाही त्याची मोठी ओळख म्हणजे जीवरक्षक ब्रेव्हो…. स्वतःच्या जीवाचा विचार न करता जीवदान देणारा देवदूत.
१०० फूट खोल विहीर आणि त्यात किमान १५ फूट पाणी होते, बाळ पडले तेंव्हा जवळपास वाचवणारे कोण नव्हते, जवळपास आढळला तो निखीलच, त्याला कोणीतरी बोलवून आणले. तो आला, बाळ विहिरीत डब पडून तरंगत होते, निखिलने विहिरीत सोडलेल्या मोटरची दोरी पकडली आणि चित्रपटातील हिरो प्रमाणे स्टंट करतच तो खाली उतरत होता… अशी माहिती या घटनेच्या प्रत्यक्षदर्शीने बेळगाव live ला दिली.
विहिरीच्या कडांना टेकून त्याने त्या बाळाला वर काढण्याचे प्रयत्न केले, पण कड भुसभुशीत असल्याने त्याचे पाय घसरत होते. वरून लोक ओरडत होते. त्याने कसेबसे बाळाला उचलले व पाणी भरून फुगलेल्या त्याच्या पोटावर दाब देण्यास सुरुवात केली. तोंडातून पाणी बाहेर येताच बाळाने आपले डोळे उघडले आणि इकडे तिकडे बघण्यास सुरुवात केली.
लगेचच वरून दोर लावून दुसरी बादली सोडण्यात आली, आणि त्या बादलीतून बाळाला वर अलगद घेण्यात आले. या निखिलच्या धाडसानेच ते बाळ वाचू शकले आहे.
बाळ पडल्या पडल्या लोक जमले होते, पण बचाव सुरू होईपर्यंत ते बाळ पोटात पाणी शिरूनही जिवंत राहिले हे नशीबच झाले. वझे गल्लीच्या मागील भागातील विहिरीत घडलेला हा प्रकार अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवून गेला आहे. ब्रेव्हो निखिल चे कौतुक होत असून त्याच्या या धाडसाबद्दल त्याचा भव्य नागरी सत्कार होण्याची तसेच राष्ट्रीय विरता पुरस्कारासाठी त्याचे नाव प्रशासनाकडून पाठवण्याची गरज आहे.
Trending Now