शहरात सुरळीत विद्युत पुरवठा करण्यामध्ये वरचेवर व्यत्यय येत आहे. यातच भर म्हणून मंगळवारी गडगडाटासहं पाऊस झाल्याने विद्युत पुरवठा ठप्प होता. विजेच्या या लहरी धोरणामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.याचा परिणाम व्यवसायावर होत असून तो चालवायचा कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मंगळवारी दिवसभर बेळगाव शहर व ग्रामीण भागात विजेचा खेळखंडोबा सुरू होता. ऐन उन्हाळ्यात असे प्रकार वारंवार घडत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. पूर्व सूचना न देता विजेचा पुरवठा बंद झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत होती. तर काही भागात पूर्वसुचना देऊनही विद्युत पुरवठा सुरू होता. लाईट जाणार म्हणून नागरिकांनी केलेली पूर्व तयारी वाया गेली.
हेस्कॉमचे निर्णय ठरतायेत फोल
यावर्षी उन्हाळ्यात 24 तास सुरळीत वीजपुरवठा करणार असे हेस्कॉमने जाहीर केले होते. परंतु मार्च महिन्यापासूनच हा निर्णय फोल ठरला आहे. ही घोषणा केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन होती का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कडोली भाग अंधारातच
या महिन्यात कडोली गावची लक्ष्मीची यात्रा आहे. त्यामुळे गावात तयारी जोरात सुरू आहे. पण गावात काही तासंच लाईट येत असल्याने तयारीची कामे संथगतीने होत आहे. खुद्द जिल्हा पंचायत उपाध्यक्ष यांच्या गावातच असा प्रकार होत असल्याने लोकप्रतिनिधी काय करत आहेत असा सवाल उपस्थित होत आहे.