Thursday, May 2, 2024

/

जय जगन्नाथ जय बलदेव जय सुभद्राचा .. जयघोष

 belgaum

हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे | हरे राम हरे राम राम राम हरे हरे॥ व जय जगन्नाथ, जय जगन्नाथ, जय बलदेव, जय सुभद्रा असा नामघोष करीत असंख्य बेळगांवकरांनी ध. सं. चौकात भगवान श्री जगन्नाथ, बलदेव व देवी सुभद्रा यांच्या रथाचे अत्यंत उत्साहात स्वागत केले. त्यानंतर भक्तांसमवेत नाचत, गात भगवान श्री जगन्नाथांनी बेळगांवनगरीत भ्रमण केले.

आंतरराष्ठ्रीय श्रीकृष्णभावनामृत संघ, बेळगाव शाखेच्यावतीने सलग २० व्या वर्षी संपन्न होणार्‍या श्री श्री जगन्नाथ, बलदेव सुभद्रा रथयात्रा महोत्सवास शनिवार दि. २० जानेवारी रोजी १.४५ वा. प. पू. रामगोविंद महाराज, प. पू. भक्ति रसामृत महाराज, प. पू. लोकनाथ महाराज आदी मान्यवरांच्या उपस्थितीत, ध. संभाजी चौक येथून प्रारंभ झाला. प. लोकनाथ स्वामी महाराज, यानी आरती केली. ज्या ज्या वेळी धर्माचे अध:पतन होते, त्या त्या वेळी भगवान श्री कृष्ण अवतरीत होतात. भगवंताच्या नामस्मरणाने चेतना शुद्ध होते, त्यासाठी ही रथयात्रा आहे असे ते म्हणाले.
ओरिसा येथील जगन्नाथपुरी येथे संपन्न होणारा श्री श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव हा जगातील सर्वात मोठा उत्सव मानला जातो. यामध्ये भाविक, श्री श्री जगन्नाथांची कृपा प्राप्त करण्यासाठी लाखो, करोडोंच्या संख्येने सहभागी होतात. एरवी केवळ हिंदूना पुरी येथील जगन्नाथ मंदिरात प्रवेश दिला जातो. परंतु रथयात्रेमध्ये, अन्य भक्तांवर कृपा करण्यासाठी भगवंत रथारुढ होऊन स्वत:हून नगरभ्रमण करतात. या रथोत्सवाद्वारे साधल्या जाणार्‍या, आध्यात्मिक लाभ, सामाजिक ऐक्य, साम्य, वैदिक संस्कृतीचा प्रचार-प्रसार इत्यादि उद्दिष्टांचा विचार करून इस्कॉनचे संस्थापकाचार्य भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यानी १९७५ साली अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिस्को येथे पहिली रथयात्रा संपन्न केली. ती इतकी प्रसिध्द झाली की तेथील महापौरानी तो दिवस सॅन फ्रॅन्सिस्कोचा रथयात्रा दिन म्हणून जाहीर केला. तेंव्हापासून आजपर्यंत दरवर्षी तेथे त्यादिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येते व हजारो लाखो लोक त्यामध्ये सहभागी होतात. आज ही रथयात्रा भारताबरोबरच न्यूयॉर्क, लॉस एंजिलिस, शिकागो, लंडन, पॅरिस, बोस्ट्न, मॉस्को, फिलाडेल्फिया, पोर्तुगाल, जर्मनी, इटली, स्पेन, जपान, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका इत्यादि देशातील अनेक प्रमुख नगरांमध्ये रथयात्रा संपन्न होते. परंतु बेळगांवमधील रथयात्रा अतिविशेष आहे. असे उद्गार यावेळी बोलताना महाराजांनी काढले. रथयात्रेच्या उद्घाट्नप्रसंगी ते बोलत होते.

iskcon bgm
विभिन्न दलांमध्ये नृत्य करीत हजारो भाविक रथयात्रेमध्ये सहभागी झाले. भक्तांच्या विशेष पथकाद्वारे रथासमोर रेखाटण्यात आलेल्या भव्य व सुंदर रांगोळ्या, रथासमवेत जाणार्‍या सुसज्जित बैलगाड्या, घोडे, बालचमुंनी प्रदर्शित केलेले गीतोपदेश, श्री रामलीला, कंसाचे अत्याचार यांचे जिवंत लक्षवेधी देखावे लोकांना आकर्षित करीत होते. पर्यावरणाची सुरक्षा ध्यानात घेउन ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या पाणी व सरबताच्या स्टॉल्समध्ये तसेच अन्य ठिकाणी प्लॅस्टीकचा वापर पूर्णपणे वर्ज्य करण्यात आला होता. तसेच भक्तांच्या विशेष पथकाद्वारे मार्गात होणार्‍या कचर्‍याची योग्य विल्हेवाट लाऊन स्वच्छतेची दक्षता घेण्यात आली. रथयात्रा ध. सं. चौक येथून निघून समादेवी गल्ली, खडे बाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, रामलिंगखिंड गल्ली, शनि मंदिर नवा ब्रिज येथून शहापूर खडे बाजार, नाथ पै चौक, आनंदवाडी मार्गे सायंकाळी ६:०० वा. श्री श्री राधा गोकुळानंद मंदिरामागे उभारण्यात आलेल्या भव्य मंट्पात पोहोचली. ठिकठिकाणी भाविकांनी आरती, पुष्पवर्षाव, नैवेद्य आदिंनी जगन्नाथांचे स्वागत केले.

 belgaum

foreign devotee
दोन दिवस चालणार्‍या या कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेल्या भव्य मंट्पातील मंदिरात व्यासपीठावर भगवान श्री जगन्नाथांना विशेष आरती व १०१ भोग अर्पण करण्यात आले. त्यानंतर व्यासपीठावर अनेक महाराजांची प्रवचने झाली.
रविवार दि. २१ रोजी सायंकाळी मंगलहोम, नाट्यलीला, प्रवचन व महाप्रसाद असा भव्य कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाचा सर्वानी मित्र ,परिवार, आप्तेष्ठांसह लाभ घेण्याचे आवाहन करीत अध्यक्षांनी आभार प्रदर्शन केले. कीर्तन व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
दोन दिवस चालणार्‍या या कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेल्या भव्य मंटपात बालकांना वैदिक संस्कृतीची ओळख करवून देण्यासाठी सुंदर करमणूक, खेळ व स्पर्धा, युवक व युवतींकरिता प्रबोधनपर विशेष कार्यक्रम, वैदिक प्रश्‍नमंच, प्रदर्शन, स्लाइड शो, व्हीडीओ शो, हरिनाम, गोरक्षा औषधी, अल्पोपहार इत्यादि अनेक स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. सुमारे ५०००० लोकांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.