Tuesday, April 30, 2024

/

दान केलेल्या शाळेचा वाद : विद्यार्थ्यांचे भवितव्य मात्र अधांतरी

 belgaum

सत्तर वर्षांपूर्वी त्याने शाळेसाठी दान केलेल्या जागेवर मुलाने हक्क दाखवण्यास सुरुवात करून ही जागा पुन्हा ताब्यात घेण्याचा प्रयत्न चालवला आहे. खेमलापूर (ता. रायबाग) येथील या प्रकारामुळे शाळा व्यवस्थापन मात्र अडचणीत आले असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अधांतरी झाले आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, खेमलापूर (ता. रायबाग) येथील निरुपादय्या मठपती या दानशूर व्यक्तीने 70 वर्षांपूर्वी गावातील शाळेसाठी आपली 10 गुंठे जागा दान केली होती. 1951 मध्ये सुरु झालेल्या सदर शाळेमध्ये सध्या 109 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेमध्ये पहिली ते सातव्या इयत्तेपर्यंत वर्ग चालतात. शाळेत एकूण सात वर्ग खोल्या असून त्यापैकी चार वर्गांची दुरवस्था झाल्याने शाळेने त्याचे पुन्हा बांधकाम करण्याचे ठरवले आहे. मात्र मठपती यांचा मुलगा मल्लय्या मठपती याने सदर बांधकामाला विरोध दर्शविला आहे.

गेली 69 वर्षे सदर शाळा अत्यंत व्यवस्थित सुरू असून 2017 मध्ये शाळेच्या चार वर्गांचे छप्पर आणि परशा काढून त्याची दुरुस्ती करण्याचे व्यवस्थापन मंडळाने ठरवले. मात्र सदर बांधकामाला मल्लय्या मठपती यांनी आक्षेप घेत हे बांधकाम थांबवले आहे. शाळा जिथे उभी आहे ती जागा आपल्या वडिलांनी दान केलेली नाही, असे मल्लया यांचे म्हणणे आहे. त्यामुळे गेल्या 3 वर्षापासून शाळेचे वर्ग उघड्यावर भरत आहेत. वर्गाचे बांधकाम करण्यास मल्लया आडकाठी आणत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

 belgaum

याबाबत मल्लया याचे असे म्हणणे आहे की, माझ्या वडिलांनी शाळेसाठी जमीन दान दिली होती. परंतु शाळेने जिथे बांधकाम केले आहे ती जागा दानातून दिलेली जागा नाही. याबाबतचे कागदपत्र आपण तपासावेत. शाळेने माझ्या जागेवर अतिक्रमण केले आहे, असे त्याचे म्हणणे आहे. तर शाळा व्यवस्थापन म्हणते की यासंदर्भात आम्ही रायबाग तहसीलदारांकडे तक्रार केली आहे. तथापि गेल्या तीन वर्षापासून हे प्रकरण प्रलंबित असून रायबाग तहसीलदारांनी ही समस्या अद्याप सोडवलेली नाही.

एकंदर व्यवस्थापन आणि मल्लया मठपती यांच्यातील वादामुळे विद्यार्थ्यांना मात्र उघड्यावर बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. विद्यार्थ्यांचा विचार करून तरी तहसीलदार या प्रकरणी त्वरित हस्तक्षेप करून यशस्वी तोडगा काढतील का? याकडे पालकवर्गाचे लक्ष लागून राहिले आहे.

News courtasy:aab

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.