काळ्या दिनी काळे ध्वज आणि वस्त्रे घालून सहभागी होणाऱ्यानो बेळगाव live चे तुम्हाला आवाहन आहे, यंदा नको गाडी….. नको घोडा…. सहभागी व्हा फक्त आणि फक्त सायकल घेऊन, सायकल नसेल तर पायी या….. चला तर मग परंपरा पाळूया…… गालबोट टाळूया आणि काळ्या दिनी आपल्याला लोकशाहीने दिलेला मूक निषेधाचा अधिकार मूकपणे बजाऊया.
१९५६ साली १ नोव्हेंबर ला सीमाभाग कर्नाटकात घालण्यात आला. तेंव्हापासून दरवर्षी या दिवशी काळादिन पाळला जातो. मूक सायकल फेरी हे काळा दिनाचे मूळ स्वरूप आहे, हे प्रत्येकाने जसेच्या तसे जपणे गरजेचे आहे.
मागील काही वर्षांत तरुण वाढले, यंदा तर तरुणांचा महापूर येईल याची आम्हाला खात्री आहे, पण येताना प्रत्येकाने एकतर सायकल आणा नाहीतर चालत या. यावर्षी पासून एकही वाहन या मूक मिरवणुकीत दिसता कामा नये याची काळजी घ्या, सायकलचाच वापर करा, हे आमचे नम्र आवाहन आहे.
युवकांनी आणि सगळ्यांनीच मोटार सायकली आणून मूक सायकल फेरीचे स्वरूप बदलले आहे. एझडी, बुलेट, स्कुटी फेरी असे स्वरूप आले आहे. हे स्वरूप वेगवेगळ्या कारणांनी घातक ठरत आहे, घोडा घेऊन आल्याने तर नको ते प्रकार झाले आणि नंतर गुन्हे दाखल करण्यात आले, परत परत याची पुनरावृत्ती होऊ नये, हे पाहणे हीच आपली जबाबदारी आहे.
यंदा आम्ही मराठा आणि मराठी क्रांती मोर्चा केला. कोणतेही वाहन नसताना १२ ते १३ लाख नागरिक सहभागी झाले आणि इतिहास घडला. अतिशय शिस्त बद्ध मिरवणूक काढण्यात आली. अजूनही वेळ आहे, समिती नेत्यांनी पुढाकार घेऊन असेच नियोजन करावे, तरच काळा दिन चे पावित्र्य टिकून राहील