सीमाभागाची ताकत दाखवून देण्यासाठी कर्नाटक विधानसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकणे महत्वाचं आहे. एकी करा आणि जास्तीत जास्त जागा जिंका, असा सल्ला दिला आहे महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री दीपकभाई केसरकर यांनी.
बेळगाव येथे ते बोलत होते, सीमावासीयांची तळमळ आपण पाहिली आहे, या तळमळीला योग्य आवाज मिळायचा असेल तर एक व्हा असे ते म्हणाले, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सीमाप्रश्न सुटेपर्यंत शिवसेना सीमाभागात निवडणूक लढणार नाही असे सांगितले होते, यामुळे स्थानिक सेना कार्यकर्त्यांनी याची नोंद घ्यावी अशी सूचना त्यांनी केली.
शहर म ए समितीचे उपाध्यक्ष टी के पाटील यांची पत्नी लीला पाटील यांना तालुका स्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला बद्दल सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते.
सीमाभागाचे नेते किरण ठाकूर, महापौर संज्योत बांदेकर, टी के पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
मराठी माणूसच मराठी माणसाचा शत्रू होऊन मागील काही दिवसात समितीचे नुकसान झाले आहे, यापुढे तसे होऊ देऊ नका, असे ते म्हणाले.
जगदीश कुंटे यांनी स्वागत केले, किरण ठाकूर, महापौर व दीपकभाई यांच्या हस्त लीला पाटील यांचा सत्कार झाला.
किरण ठाकूर यांनी आम्ही लोकशाही मार्गाने लढत असताना आमच्यावर राष्ट्रदोह घातला जातोय, केंद्राने हे कर्नाटक सरकारच बरखास्त करावे असे उद्गार काढले. लीला पाटील यांनी सत्काराला उत्तर देऊन आभार मानले, महापौरांनी आदर्श शिक्षकांचे महत्व सांगितले,. लोकमान्यांचे समनव्य अधिकारी विनायक जाधव यांनी सूत्रसंचालन केले.