Friday, November 15, 2024

/

अल्झायमर -वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

 belgaum

DR sonali sarnobat

अल्झायमरची व्याधी ‘डिमेन्शिया’ गटातला रोग असून त्यास सिनाईल डिमेन्शिया असेही संबोधिले जाते. माणसाचा मेंदू आस्तेकदम कुरतडणार्या या विकारावर ईलाज उपलब्ध नाही. जर्मन मानसतज्ज्ञ अलॉईस अल्झायमर यांनी १९०६ साली या व्याधीची नोंद केली होती. अल्झायमरची व्याधी ही वयोवृद्ध लोकांसाठी एक मोठी समस्या असते. हा रोग वार्धक्यातील जीवनाची पुरती चिरफाड करून टाकतो. वारंवार होणार्या विस्मरणामुळे रुग्ण एक गोष्ट पुन्हा पुन्हा विचारीत राहतो. प्रत्येक गोष्टीची त्याला सारखी आठवण करून द्यावी लागते. पूर्वी सहजपणे हाताळलेल्या गोष्टी पूर्ण करताना अडथळे निर्माण होतात. दैनिक कामे उरकण्याची क्षमता रुग्ण हरवून बसतात. वेळ आणि स्थळासंबंधी त्यांचा गोंधळ उडतो. रंग ओळखणे, अंतर समजणे, वाचन करणे, दृष्टीदोष यासारखी लक्षणे अल्झायमरच्या रुग्णात सर्रासपणे दिसून येतात. शिवाय लिहिताना किंवा बोलताना ते शब्दांसाठी अडतात. वस्तू सहज हरवणे वा कुठे ठेवल्या आहेत हे न आठवणे हे तर नियमित घडू लागते. त्यांचे अंदाज चुकतात. ते एकाकी बनतात व स्वतःला सार्वजनिक वा सामाजिक कार्यक्रमापासून दूर ठेवतात. त्यांचे मूड वारंवार बदलतात किंवा बिघडतात. हळवेपणा, निराशा, संशय, भीती, चिंतातूर भाव त्यांच्या चेहर्यावर उमटतात. ही सारी लक्षणे त्या वयस्कर व्यक्तीची अवस्था केविलवाणी करून सोडतात. ही व्याधी साधारणतः ६५ वर्षापेक्षा मोठ्या वृद्धांना जडत असते. इ.स. २००६ साली जगभरात २ कोटी ६६ लाख अल्झायमरची लागण झालेले रुग्ण होते. ही संख्या २०५० सालापर्यंत प्रत्येक ८५ नागरिकांमागे १ इतकी पोहोचण्याचा अंदाज केला गेला आहे. डीमेन्शिया गटातील कुठल्याही व्याधीत मेंदूच्या कार्यात बाधा येते व अल्झायमर तर त्या गटातला प्रमुख विकार बनून राहिला आहे. माणसाची स्मरणशक्तीच काय पण विचारशक्तीदेखील खालावून त्याच्या स्वभावाचा कायापालट करण्याची विध्वंसक शक्ती या रोगामध्ये आहे. हा विकार रक्ताच्या नात्याशी निगडित असतो. भाऊ, बहीण किंवा आईवडिलांना अल्झायमर झाला असेल तर आपलाही धोका वाढतो, असे आढळून आले आहे. त्याचप्रमाणे दीर्घकाळचा रक्तदाब, वांशिक डोकेदुखी, स्त्रीलिंगी असणे या घटकांमुळे एखाद्यात या व्याधीची शक्यता वाढते. या रोगाचे दोन प्रकार आहेत. साठ वर्षे वयाच्या आधी प्रारंभ होणारा एक प्रकार, तर दुसरा साठीनंतर उद्भवणारा असतो. पहिला प्रकार फार दुर्मिळ असतो व त्याच्याशी निगडित बर्याच जनूकांना संशोधकांनी हुडकून काढले आहे. दुसर्या प्रकारच्या व्याधीसंबंधी फारसे उपयुक्त संशोधन झालेले नाही. हे दोन्ही वंशपरंपरेने पुढल्या पिढीत अवतरतात, तरीही दुसर्या प्रकारात ते प्रमाण कमी आहे, एवढेच. अशाप्रकारे मानसिकदृष्ट्या विकलांग झालेल्या वयोवृद्ध मंडळींची नीट काळजी घेतली जावी, त्यांच्या सेवेची नीट जाणीव व्हावी यासाठी आजचा दिवस त्यांच्यासाठी राखला जातो. हा विशेषतः जागरूकता दिवस आहे. त्यासाठी सर्वसामान्यांना त्या रोगाविषयी माहिती व्हावी, रुग्णांना हाताळण्याचे प्रशिक्षण मिळावे, रुग्णांना आधार मिळावा; असे विविध हेतू या दिवसातील उपक्रमामध्ये दडलेले असतात. या दिवसाला ‘नारिंगी दिन’ असेही म्हटले जाते व त्या दिवशी नारिंगी रंगाची वेषभूषा किंवा साधने-उपकरणे-वस्तू वापरण्याचे आवाहन केले जाते.
अॅलोइस अल्झेमर नावाच्या एका जर्मन डॉक्टरने १९०६ साली ह्या आजाराचा शोध लावला. त्यामुळे ह्याला अल्झायमर डिसीज नाव देण्यात आले. मेंदूतील पेशींची विचित्र गुंतागुंत आणि चमत्कारिक गुठळ्या अशा अवस्थेत एका मृत स्त्रीचा मेंदू त्याने अभ्यासला. स्मरणशक्तीच्या विचित्र लक्षणांमुळे तिचा मृत्यु झाला होता. त्या लक्षणांचा संबंध तिच्या मेंदूच्या रचनेशी असल्याचा तर्क करणारा हा जगातील पहिला शास्त्रज्ञ म्हणून ओळखला गेला. अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचे तर अल्झायमर डिसीज म्हणजे विसरभोळेपणा वाढत जातो. पहिले पहिले नाव विसरणे नंतर नाती विसरणे, जेवण खाणे विसरणे अशाप्रकारे लक्षणांमध्ये वाढ होत जाते. सुरुवातीला घरातल्या इतरांना हा अगदी थट्टा मस्करीचा विषय होतो. रोगाचे गांभीर्य कळू लागले की डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागते. वास्तविक तेव्हा फार उशीर झालेला असतो. कारण अल्झेमर्सची सुरुवात मेंदूमध्ये झाल्यानंतर जवळपास दहा वर्ष उलटल्यानंतर मगच सुरुवातीची लक्षणे दिसू लागतात असा शास्त्रज्ञांचा अभ्यास आहे. ६५ वर्षे वया नंतर शेकडा २० टक्के लोकांमध्ये अल्झायमर होण्याची शक्यता असते असा निष्कर्ष अभ्यासातून काढला गेला आहे.

अल्झायमर ची कारणे काय?

आज ह्या रोगाची वैद्यक शास्त्राला ओळख होऊन ११० वर्षे झाली आहेत. पण ह्याचे कारण फक्त ३ शब्दांत म्हणजे – ”नक्की माहीत नाही”

अनेक संस्था, डॉक्टर्स, शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आपल्या ज्ञान कौशल्याची शिकस्त करुनही आज ह्या आजारावर नक्की इलाज सापडलेला नाही ही बाब खरी आहे. मुळात कारणच माहित नाही तर उपचार करणार तरी कुठल्या आधारावर? ह्या आजाराचे निदान करण्यासाठी फक्त लक्षणांचाच आधार घ्यावा लागतो. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित यंत्रसामग्री पण विशेष उपयोगी पडत नाही. मृत्यू नंतर शवविच्छेदन करण्याची वेळ आली तरच त्याचा उलगडा होतो.

अल्झायमर होऊ नये म्हणून :

अल्झायमर होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी ह्या विषयी बरेच काही वाचायला मिळते. त्यात ”नियमित व्यायाम करावा, सकस – हलका व आपल्याला पचेल असाच आहार घ्यावा, ताजी फळे – पालेभाज्या खाव्यात, आनंदी व उत्साही वातावरण ठेवावे असे काही उपाय सांगितले जातात. वास्तविक हे उपाय सर्वसाधारण प्रकृती उत्तम ठेवण्यासाठी पण सांगितले जातात, अल्झायमर होऊ नये म्हणून विशेष असे ह्यात काहीही दिसत नाही. नाही म्हणायला डोनपझिल आणि रिव्हास्टिगमिन नावाची दोन औषधे आहेत. शौचाला पातळ होणे, सतत लघवी होणे, मळमळणे, उलटी, निद्रनाश, चित्रविचित्र स्वप्न, चक्कर, वजन घटणे, हाता-पायात गोळे, सांधेदुखी, डोकदुखी अशी अनेक लक्षणे होतात. शिवाय इतर औषधांच्या उपयुक्ततेवर विपरित परिणाम होतात. हे उपचार रोग बरा करण्यासाठी नसून फक्त तात्पुरता आराम देण्यासाठी आहेत एवढे लक्षात ठेवले पाहिजे. थोडक्यात म्हणजे अल्झायमर डिसीज वर हमखास उपयोग होईल असा काही इलाज आजतागायत आधुनिक वैद्यक शास्त्रात नाही. पण शास्त्रज्ञांनी ह्या विषयावर जो काही अभ्यास केला आहे त्यावर आधारित काही आयुर्वेदिक तत्वांचा आणि उपचारांचा असा एक वेगळी दिशा दाखवणारा प्रामणिक प्रयत्न आपण करू शकतो.

मेंदूचा विचार :

मेंदूची रचना किंवा घडण करण्यामध्ये ७० टक्के वाटा स्निग्ध पदार्थांचा आहे आणि ३० टक्के वाटा प्रथिनांचा आहे. म्हणजेच मेंदू हा मुख्यतः स्निग्ध पदार्थांनी घडलेला भाग आहे.
आहार :
स्निग्ध आहार डाएट च्या नावाखाली वर्ज्य न करता त्यांचा पुरेसा समावेश आहारात हवा .
होमिओपॅथी:
अनेकविध औषधांनी युक्त होमिओपॅथीने हा आजार सुकर होतो.
उदा. अर्स अल्बम, फाॅस्फरस, प्लंबम मेट ई.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.