Saturday, January 25, 2025

/

चेहऱ्यावरचे काळे डाग,वांग-वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

 belgaum

sonali sarnobat

त्या दिवशी माझ्यासमोर एक पेशंट धसमुसत येऊन बसली.

पेशंट: (हताश स्वरात) मला काळे चट्टे आले आहेत! खूप दिवसांपासून आहेत. नाना उपचार करूनही बघितले. थोड्या दिवसांसाठी फरक दिसतो पण मग क्रिम्स लावायचं बंद केलं की परत ते डाग गडद दिसू लागतात. (तिने वापरलेल्या क्रिम्स ची एक पिशवी माझ्यासमोर रिकामी केली)
मी: अच्छा… हे सर्व क्रिम्स वापरले आहेत का?
पेशंट: (चिडलेल्या स्वरात) अहो विचारू नका! याहून जास्त! फेअरनेस क्रिम्स, घरगुती उपाय, आयुर्वेदिक उपचार व त्वचारोगतज्ञाकडे सुद्धा गेले होते! प्रॉब्लेम तोच. थोडा फरक पडतो पण डाग परत दिसू लागतात.
तिशीतली बाई. खूप वैतागलेली होती. तिला सर्वांनी सांगितलं तर होतं की तिला वांग झाला आहे पण  वांग विषयी संपूर्ण माहिती दिली नव्हती. माझ्याकडे येणाऱ्या अनेक पेशंट्सची हीच गत असते. अर्धी माहिती असल्यामुळे पेशंट्स त्रासलेले व कंटाळलेले असतात. मग विचार आला की वांग या विषयवार जरा तुम्हा सर्वांना माहिती द्यावी.
वांग ला वैद्यकीय भाषेत मेलास्मा (Melasma) किंवा क्लोआस्मा (Chloasma) असं नाव आहे. याला दुसरं नाव आहे मास्क ऑफ प्रेग्ननसी (Mask of Pregnancy). नावावरून लक्षात आलंच असेल की सर्वसाधारण वांग चे काळे डाग पहिल्यांदा गर्भवती स्त्रियांमध्ये दिसतात. पण हल्ली वांग हा प्रकार एका विशिष्ट वयात सीमित किंवा गर्भवती स्त्रियांमध्ये सीमित नाही राहिला. शिवाय गरोदर स्त्रियांमध्ये हा त्रास होतो म्हंटल्यावर असं वाटतं की हा आजार स्त्रियांमध्येच दिसतो. पण तसं नसून हा आजार पुरुषांमध्ये सुद्धा दिसतो. म्हणजे जर वयोगट बघितलं तर हा आजार २५ ते ६० पर्यंत कोणत्या ही वयात, स्त्रियांना व पुरुषांना दोघांना ही होऊ शकतो. मात्र स्त्रियांमध्ये हा आजार जास्ती प्रमाणात आढळतो.(www.kedarclinic.com)

 belgaum

वांग चे डाग चेहऱ्यावर विविध कारणांमुळे दिसतात. एक तर संप्रेरकांच्या प्रभावामुळे. म्हणूनच गरोदरपणात जिथे संप्रेरक कमी जास्त होत असतात अशा अवस्थेत हे डाग उमटू शकतात. परंतु ज्या बायका गर्भनिरोधक गोळ्या घेत असतात त्यांच्यात ही अनेकदा हे डाग चेहऱ्यावर दिसू लागतात. पण हल्ली हे डाग पुरुषांमध्ये ही दिसू लागले आहेत. कामानिम्मित पुरुषांना उन्हात जास्त फिरावं लागतं. म्हणून उन्हाच्या अतिनील किरणांच्या प्रभावुळे, त्वचेतील रंगपेशी त्वचेच्या संरक्षणासाठी रंग निर्माण करायला लागतात.
मी आधीही माझ्या लेखांमध्ये सांगितलं आहेच की त्वचेतील रंगावर अतिनील किरणांचा सारखा प्रभाव होत असतो (www.kedarclinic.com)याउपर अनुवंशिकते मुळे सुद्धा वांग निर्माण होऊ शकतो. पूर्वीच्या काळी वांग सर्वसाधारण प्रमाणे गर्भवती स्त्रियांमध्ये दिसायचा. पण हल्ली जीवनशैलीत परिवर्तन आल्यामुळे वांग कधीही निर्माण होताना दिसतो. त्याची कारणं अशी- सतत ची धावपळ, अव्यवस्थित आहार, जागरण (विशेषतः रात्रीचे शिफ्ट्स करणारे) ई. अशावेळी संप्रेरक अनियमित काम करायला लागतात व म्हणून वांग निर्माण होतो.
अनेक कॉस्मेटिक क्रिम्स आहेत उदाः फेअरनेस क्रिम्स किंवा मेक अप चे पदार्थ ज्या मुळे त्वचेवर दुष्परिणाम होऊन वांग निर्माण होऊ शकतो. Hypothyroidism ( थायरोईड ग्रंथी च्या संप्रेरकाचा अभाव)  च्या आजाराबरोबर वांग दिसू शकतो.
वांग चे डाग तपकिरी ते काळे रंगाचे व विविध आकाराचे चट्टे म्हणून चेहऱ्यावर दिसू लागतात. अनेकदा, स्त्रियांमध्ये, पाळीच्या दिवसांमध्ये ते गडद दिसतात आणि इतर दिवसांमध्ये फिकट. अनेक लोक असं ही सांगतात की उन्हात ज्या दिवशी जास्तं फिरणं होतं त्या दिवशी डाग गडद दिसतात.

वांग चे डाग चेहऱ्यावर जिथे दिसतात त्याप्रमाणे वांग च्या डागांचं वर्गीकरण केलेलं आहे.
१. Centrofacial/ सेंट्रोफेशीअल : यात कपाळावर, गालांवर, नाकावर व वरच्या ओठांवर डाग निर्माण होतात.
२. Maxillary/ माक्सीलरी: यात फक्त गालांवर डाग निर्माण होतात
३. Mandibular/ मांडीब्यूलर : ज्यात फक्त जबड्यावर वर डाग निर्माण होतात
४. कानांच्या समोर जो गालाचा भाग आहे तिथे डाग निर्माण होऊ शकतात
तसच, रंग त्वचेच्या कोणत्या थरात आहेत त्यावरून सुद्धा वर्गीकरण करता येतं
१. Epidermal/ एपीडर्मल : त्वचेवरच्या सर्वात वरच्या थरात रंग आढळतो
२. Dermal/ डर्मल: त्वचेतल्या दुसऱ्या थरात रंग आढळतो
३. Mixed/ संमिश्र: म्हणजे दोन्ही पहिल्या आणि दुसऱ्या थरात रंग दिसतो.
सर्वसाधारणरित्या लोकांना तिसऱ्या प्रकारचा वांग असतो. म्हणजे त्वचेच्या दोन्ही थरांमध्ये रंग दिसतो. मी आधीच्या माझ्या एका लेखा मध्ये सांगितलं होतं की त्वचेचा
एपिडर्मल थराची सतत नवनिर्मिती होत असते तसच दुसरा थर म्हणजे डर्मिस ची नवनिर्मिती नाही होत. म्हणूनच अनेक लोकांची ही तक्रार असते की नियमित उपचार घेऊन देखील डाग संपूर्ण नष्ट होत नाहीत. डाग हलके होतात पण त्वचा जशी पूर्ववत होती तशी होत नाही. त्याचं कारण हे असं की मुळात एपीडर्मिस ची सतत नवनिर्मिती होत असल्यामुळे त्या थराबरोबर तो रंग ही फेकला जातो. परंतु डरमिस मधला रंग मात्र बाहेर फेकला जात नाही कारण मुळातच डर्मीस थराची निर्मिती होत नाही. म्हणून उपचारामुळे सुरवातीला डाग फिकट होताना दिसतात पण एका विशिष्ठ कालावधी नंतर डाग कमी होत नाहीत. डॉक्टर ही अनेकदा अर्धवट माहिती देत असल्यामुळे अनेक पेशंट्स त्रासलेले असतात जशी माझ्याकडे आलेली पेशंट त्रासलेली होती.
या आजारावर अनेक उपचार पद्धती उपलब्ध आहेत.
१. वांग च्या उपचारामध्ये सर्वात महत्वाचा उपचार म्हणजे उन्हापासून संरक्षण. वांग निर्माण होण्याचं कारण काहीही असो शेवटी उन्हाच्या अतिनील किरणांमुळे डाग गडद होत जातात. म्हणून उपचार कितीही केला आणि उन्हापासून आपण संरक्षण घेतलं नाही तर कोणत्याही उपचाराचा काहीही उपयोग होत नाही. अनेक सनस्क्रीन बाजारात आहेत. परंतु सनस्क्रीन नेहमी त्वचारोगतज्ञाच्या सल्ल्याप्रमाणे लावावे. कारण प्रत्येकाची त्वचा वेगळी आणि म्हणून प्रत्येकासाठी वेगळं सनस्क्रीन उपयोगाचं ठरतं. आणि कोणाला कोणतं सनस्क्रीन उपयोगाचं ठरेल हे त्वचारोगतज्ञच ठरवू शकतो. लावताना सुद्धा सनस्क्रीन लावायची पद्धत आहे. व्यवस्थित लेप लावला गेला पाहिजे. सुरुवातीला चेहऱ्यावर एक पांढरटसर छटा दिसते परंतु साधारण अर्धा तासानी त्वचेवरची ती पांढरट छटा नाहीशी होते. याचं कारण असं, की सनस्क्रीनला व्यवस्थित काम करायला त्वचेच्या पेशींशी जाऊन जोडावं लागतं. या प्रक्रियेला साधारण अर्धा तास लागतो. त्या नंतरच सनस्क्रीनचं काम सुरु होतो आणि सनस्क्रीन लावल्याचा पूर्ण फायदा होतो. बरेच लोक सनस्क्रीन लावतात आणि लगेच बाहेर पडतात. असं केलं तर सनस्क्रीनचा काहीही उपयोग होत नाही. भारतीय त्वचेसाठी साधारण २० SPF च्या वर असलेला सनस्क्रीन वापरावा.
२. Topical treatment : Hydroquinone युक्त, ग्लायकोलीक एसिड युक्त, कोजिक एसिड युक्त, आरब्यूटीन युक्त क्रिम्स आहेत जे लावल्याने डाग कमी होण्यात मदत होते. पण हे सर्व उपचार त्वचारोगतज्ञाच्या सल्ल्यानुसार घेऊनच फायद्याच्या ठरतात.
३. केमिकल पील: यात विविध प्रकारचे एसिडचा प्रयोग केला जातो. हा उपचार दर १५ ते २० दिवसांनी त्वचारोगतज्ञाकडे जाऊन घ्यावा लागतो. सर्वसाधारण ५ ते ८ वेळा नियमित उपचार करून घेतल्याने फरक निश्चित दिसू शकतो. अर्थात नुसत्या पील ने फायदा कमी होतो. त्याचबरोबर डॉक्टरांनी दिलेले मलम वापरायला लागतातच.
३.Microdermabrasion: यात अलुमिनिअम ऑक्साईड क्रिस्टल चा वापर केला जातो. यात क्रिस्टल चे कण चेहऱ्यावर एका यंत्रणाद्वारे फिरवले जातात. याने त्वचेचा वरचा थर आपण अल्पकाळात पुन्हा उत्पन्न करायच्या प्रयत्नात असतो. त्याचा परिणामअसा होतो की त्या थरतील रंगाचा सुद्धा त्या थरबारोबर नाश होतो व नवीन येणारी त्वचा ही कोवळी बिनडागाची असू शकते.
३. लेसर थेरपी: हल्ली लेसर थेरपी बद्दल खूप चर्चा सुरु आहे. मी तर म्हणेन की त्या विषयी एका प्रकारचं fad/ कुतूहल निर्माण झालेलं आहे. अर्थात लेसर थेरपी अनेक आजारांसाठी वापरली जाते. परंतू वांग साठी जेव्हा जेव्हा याचा उपयोग करण्यात आलेला आहे तेव्हा तेव्हा मात्र तो प्रयत्न फोल ठरलेला आहे. मी असं नाही म्हणणार की फायदा अजीबात होत नाही. पण फायदा खूप होतो असं नाही. जेव्हा सर्व प्रकारचे उपचार करून (म्हणजे क्रिम्स व केमिकल पील ई.) देखील फायदा झालेला नसतो तेव्हा लेसर चा एक वेळ वापर करून बघता येऊ शकतो. पण त्याचे परिणाम फार काही मोठे नसतात. जर कोणी लेसर थेरपी ने वांग चे डाग घालवण्याची शाश्वती देत असेल तर मात्र सावध रहा.
तर अशी आहे वांग ची कहाणी.
माझ्याकडे आलेल्या पेशंट ला मी शांतपणे समजावण्याचा प्रयत्न केला. की वांग का होतो कसा होतो व कशामुळे वाढू शकतो. उपचार कसा घ्याचा हे ही सांगितलं. आणि माझ्या इतर पेशंट्सना मी जो सल्ला देते तोच तिला ही दिला. की कदाचित एक टप्पा असाल येईल  जेव्हा आपल्याला जाणवेल की डाग फिकट होत नाही आहेत, तो टप्पा आपण गाठला की मी तुम्हाला सांगेन. मग तिथून पुढे आपण त्वचा maintain करूया.
पेशंट: ( हसत) चला ! म्हणजे कुठे थांबायचं हे तरी कळेल. सगळे डाग गेले नाही तरी चालतील पण ही सतत ची कटकट आणि डाग जातील की नाही या द्विधा मनस्थीतून तर सुटले!
मी: ये बात है मॅडम!
हसत हसत तिने माझा निरोप घेतला.
या विकारावर आमचे होमिओपॅथिक उपचार अत्यंत प्रभावी असतात .
Dr Sarnobat’s Homeopathic clinic and research center
Amar empire, Goaves Belgaum 590011
0831-2431362
0831-2431364

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.