बेळगाव शहरातील कॅम्प भागात जुन्या ब्रिटिश कालीन इमारतींचा भरणा आहे या ऐतिहासिक इमारती शहराचं वेगळेपण टिकवून आहेत त्यातीलच एक असलेलं सेंट मेरिज चर्च ही इमारत होय. कॅन्टोन्मेंट विभागात असलेले सेंट मेरिज चर्च १४८ वर्षांचे झाले आहे.१५ एप्रिल १८६९ मध्ये मुंबई प्रांताच्या तत्कालीन गव्हर्नर नी याची उभारणी केली होती, आजही त्याचे वैभव टिकून आहे.
या चर्च चा आराखडा रेव्हरंड फ्रान्सिस गेल यांनी बनविला होता. तत्कालीन लष्कर दलाचे गॅरिसन इंजिनिअर यांच्या देखरेखीखाली एकंदर बांधकाम झाले होते. गोकाक येथील गुलाबी खडकाचा वापर करून बांधकाम झाले असून अळनावर व दांडेली भागातील सागवानी लाकडाचा वापर झाला होता. पूर्ण बांधकाम होण्यासाठी ५ वर्षे लागली होती. अतिशय सुंदररित्या कोरीवकाम केलेल्या कमानी आणि खांब हे या चर्चचे वैशिष्ट ठरतात. छताला तब्बल २०१७ कमानी बसविण्यात आलेल्या आहेत. अंतर्गत आल्हाददायक वातावरण सुखद अनुभव देऊन जाते.
आतील कमानी तसेच सजावट सागवानी लाकूड व सुंदर रंगीत काचेचा वापर करून झाली आहे. या काचेवर कोलाज करण्यात आले आहे.ते २० फूट उंच आणि ८ फूट रुंद आहे. खास इटलीहून ते मागविण्यात आल्याची माहिती मिळते. १२ फ्रेम्सच्या माध्यमातून जिजस च्या जन्मापासूनच्या प्रसंगांची चित्रे त्यात समाविष्ट करण्यात आली आहेत. या काचेतून येणारी सकाळच्या वेळी सुंदर दिसणारी सूर्यकिरणे श्वास रोखून धरायला लावतात.
चर्च चे मुख पश्चिमेकडे आहे. यामुळे सकाळी सूर्य उगवला कि मागच्या बाजूला बसविण्यात आलेल्या काचेतून त्याची किरणे येतात. मुळात तशी रचनाच करण्यात आली आहे. मुख्य प्रवेशद्वार गॉथिक पद्धतीचे आहे. त्याला दगडी कमान आहे.
याठिकाणी अंगलीकन पद्धतीने सर्व पूजा व प्रार्थना होतात, स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी ते आर्मी गॅरीसन चर्च म्हटले जायचे. लष्कराचे स्थानिक प्रमुख कमांडन्टआणि मुंबई प्रांताचे बिशप देखभाल करीत असत, इंग्लंडच्या कँट बरी चे आर्चबिशप प्रमुख असत, आजही स्थानिक लोक या चर्चला इंग्लंडचे चर्च किंवा हाय चर्च म्हणतात.
हे चर्च मुंबई धर्मप्रांत विश्वस्थ मंडळाची मालमत्ता आहे. त्याचे मुख्या लय मुंबईत आहे. पहिल्यांदाच स्वातंत्र्यनन्तर या मंडळाने या चर्च भोवतालची जुनी भिंत बांधण्याचे काम हाती घेतले होते.