मा. उद्धवजी ठाकरे
मी एक सामान्य सिमावासीय बोलतोय, तुम्हाला पत्र लिहिण्याचे कारण तसेच महत्वाचे आहे, मला माझ्या मनातले बोलायचे आहे. सीमाप्रश्नी तुमची भूमिका आता ठोसपणे मांडण्याची वेळ आली आहे आणि त्यासाठी तुम्ही केंद्राला ठणकावून सांगावे अशीच माझी तमाम सीमावासीयांच्या वतीने मागणी आहे.
सीमाप्रश्नाचा दावा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, या दाव्यात केंद्राने कर्नाटकची तळी उचलून धरण्याचा प्रयत्न वारंवार झाला आहे, सध्याही तो होत आहे, सीमाभाग महाराष्ट्राला जोडला जाऊ नये हे उत्तर भारतीयांनी वर्चस्व राखलेल्या केंद्रातील सत्ताधाऱ्यांचे कायमचे म्हणणे आहे, महाराष्ट्र मोठा झाला तर मराठी माणूस दिल्लीत राज्य करेल हि भीती त्यामागे दिसत आहे, यासाठी आत्ताही जे नेहरूंनी केले तेच पुढे चालवीत नेण्याचे काम मोदीही करू लागले आहेत.
सर्वोच्च न्यायालयात दावा सुरु असताना कर्नाटकाच्या मागणीवरून बेळगावचे नामांतरण याच केंद्राने केले आणि बेळगावी होताना कर्नाटकचे खासदार वरचढ ठरले हे किती मोठे दुर्दैव? तेंव्हा महाराष्ट्राचे आणि तुमच्या आमच्या शिवसेनेचे खासदारही मूग गिळून गप्प होते हे त्यापेक्षा मोठे दुर्दैव नाही का?
आज शिवसेनेच्या जीवावर महाराष्ट्रात भाजपचे सरकार आहे, तेथे तुम्ही नाक दाबले नाहीत त्याचे कारण अजून संभ्रमात टाकण्यासारखे आहे, मात्र आता केंद्र कर्नाटकची बाजू घेत असतानाही ते नाक दाबले गेले नाही तर सीमावासीयांच्या आधारवड शिवसेनेने पुन्हा एक संधी घालवून टाकल्यासारखे होईल यात शंका नाही, म्हणून उद्धवजी जागे व्हा असे हक्काने सांगण्याची वेळ माझ्यावर आली आहे.
त्या भाजपने हिंदुहृदय सम्राटांचे उपकार धुळीत मिसळले, तोच भाजप आज कर्नाटकात सत्ता काबीज करण्याचे गणित आखत आहे. शिवसेनेचा वारंवार अपमान करीत आणि सीमाप्रश्नी महाराष्ट्राची बाजू घेतली तर मते मिळणार नाहीत अशा पद्धतीने सीमावासीयांच्या भावनांशी खेळत त्यांचे डाव शिजत आहेत , ते डाव शिजण्या पूर्वीच उधळून लावण्याची ताकत तुम्हीच दाखवू शकता, म्हणून हे पत्र, नाहीतर या राजकारणात फक्त सीमाप्रश्न नव्हे मुंबईसह महाराष्ट्र भरडून जाईल हे आजच लिहून ठेवा,
कळावे
आपला
एक त्रस्त
सिमावासीय