बेळगाव शहराशी संबंधित तीन आणि खानापूरच्या एक अशा चार मतदार संघात यावेळी विजय खेचून आणण्याचा प्रयत्न सध्या काँग्रेस पक्षही करू लागला आहे. सध्या बेळगाव उत्तर या एकाच ठिकाणी काँग्रेस चा आमदार आहे, येत्या निवडणुकीत हि संख्या वाढेल की अंतर्गत वादात असलेली जागाही जाणार असेच वातावरण सध्या आहे.
सेठ यांच्या विरोधात लॉबिंग सुरु
बेळगाव उत्तर मध्ये काँग्रेस चे फिरोज सेठ आमदार आहेत, सलग दोनदा त्यांनी विजय मिळवला, समिती उमेदवारांना न मिळालेले संख्याबळ आणि भाजपमध्ये उमेदवार निवडीवरून झालेली फूट याचा फायदा सेठ यांना झाला, यावेळी मात्र काँग्रेसची मंडळीच सेठ यांना आव्हान ठरू लागली आहेत यामुळे तिकीट मिळण्यापासून वाद आहेत. लखन जारकीहोळी यांनी उत्तर मधून उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी सुरु केली आहे तसेच अनिल पोतदार यांचेही आव्हान आहे, यामुळे काँग्रेस ला उत्तर मतदार संघात कसोटीचा क्षण आहे.एम आय एम ची मुस्लीम युवकांतील वाढती लोकप्रियता कितपत काँग्रेस ला डॅमेज करते हे सुद्धा निर्णायक ठरण्याची शक्यता आहे .
दक्षिणेत जयराज की मुनवळळी
बेळगाव दक्षिण मध्ये मराठा उमेदवार जयराज हलगेकर आणि कन्नड भाषिक असले तरी आपल्या सामाजिक कार्याने प्रसिद्ध शंकर मुनवळ्ळी यापैकी कोणाचा नंबर लागणार यावर काँग्रेस चे भवितव्य ठरेल, तिकीट मिळाले नाही तरी मुनव ळ्ळी यावेळी रिंगणात उतरणार आहेत तेंव्हा असलेली मते विभागण्याची चिन्हे आहेत. जयराज हे सतीश तर मुनवळ्ळी हे रमेश जारकीहोळली यांचे उमेदवार आहेत, यामुळे त्यांच्यात नेमका कोण सरस ठरणार हे स्पष्ट नाही.
लक्ष्मी यांचा करिष्मा चालणार का?
बेळगाव ग्रामीण मध्ये काँग्रेस महिला प्रदेश समितीच्या राज्य अध्यक्षा लक्ष्मी हेब्बाळकर यांना मागील वेळी पराभव स्वीकारावा लागला तरी मागील चार वर्षात त्यांनी आपला प्रभाव टिकवून ठेवला आहे, यावेळी मतदार संघाला महिला आरक्षण आणून त्या स्वतःसाठी वाट मोकळी करून घेण्याचा तयारीत असल्याचे कळते.असे झाल्यास त्या आपला करिष्मा चालवू शकणार आहेत, मागच्या वेळी प्रमाणेच आनंदस्वामी गडदेवरमठ हे पुन्हा दाखल झाले आणि पुन्हा मते विभागली तर लक्ष्मी यांना अवघड आहे.जिल्हा पंचायत सदस्य मोहन मोरे देखील तयारीला लागलेत हेब्बाळकर ना कितपत टक्कर देतात हा विषय औत्सुक्याचा आहे.
खानापुरात अंजली ताई वरचढ
खानापूर मतदार संघातही तिकीटवरून वाद आहेतच, आयपीएस अधिकारी हेमंत निंबाळकर यांच्या पत्नी अंजली निंबाळकर यांनी मागील वेळी बंडखोरी केली तर रफिक खानापुरी हे काँग्रेस चे अधिकृत उमेदवार होते. सध्या नेमकी उलटी स्थिती होण्याची शक्यता आहे, निंबाळकर यांचे पक्षात मोठे वजन आहे यातच सध्या बालभवन च्या राज्य अध्यक्ष हे मोठे पद त्यांच्या हाती आहे यामुळे त्यांना तिकीट मिळाले तर त्या विजयाच्या शिल्पकार ठरू शकतात.
काँग्रेस ची रणनीती काय असेल याबद्दल सगळीकडे चर्चा आहे, जार्किहोळी बंधूंच्या राजकारणाचा एकंदर परिणामही येत्या निवडणुकीत पक्षाच्या विजय पराजयावर होणार आहे.
पुढील भागात वाचा भाजप ची दशा आणि दिशा