Wednesday, January 8, 2025

/

मानदुखी -डॉ सोनाली सरनोबत यांच्या हेल्थ टिप्स

 belgaum

साधारणत: वयाची पस्तीशी किंवा चाळीशी उलटली की, घराच्या बाहेर भरपूर फिरणार्‍या लोकांना मानेचे त्रास सुरू होतात आणि कधी तरी गळ्याभोवती पट्टा पडतो. स्पॉन्डिलायटिस्ने जखडून टाकले जाते. प्रत्येक मानदुखी ही स्पॉन्डिलायटिस्मुळेच असते असे नाही. परंतु अन्यही काही कारणांनी मानदुखी सुरू होऊ शकते. भरपूर काम करणे, संगणकापुढे बसताना आपली उंची आणि संगणकाचा स्क्रीन यांच्यात ताळमेळ नसणे किंवा मान उंच करून स्क्रिनवरचा मजकूर सतत वाचणे यामुळेही मानदुखी सुरू होते आणि डॉक्टरकडे जाण्याची वेळ येते.

 

जगातल्या दोन तृतीयांश लोकसंख्येला कधी ना कधी तरी मानदुखीचा त्रास झालेलाच असतो असे आढळून आलेले आहे. कारण मानदुखीची कारणे फार वेगवेगळी आहेत. काही लोकांना पाठीच्या मणक्यामध्ये दोष निर्माण झाल्यामुळे मानदुखी सुरू होऊ शकते. प्रवासात भरपूर धक्के बसल्यामुळे सुद्धा मानेचा त्रास होऊ शकतो. त्याचबरोबर आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे घसा दुखू लागला म्हणजे मानही दुखू लागते. विशेषत: घशाला जर संसर्ग झाला असेल तर तो संसर्ग मानेला त्रासदायक ठरू शकतो.

 

 

मानदुखीचा आजार भारतात खूप आढळतो. मानदुखी ही मुख्यत: मानेतील मणक्यांचा आजार आहे. मणके झिजून त्यातली कूर्चा-गादी दबणे,बारीक अस्थि-गुठळया तयार होणे, यामुळे आतील चेतारज्जू आणि बाहेर पडणा-या नसांना घर्षण व इजा होणे या सर्वांचा मिळून हा आजार होतो.

 

 

कारणे

मणक्यांची झीज होणे हा यातला मुख्य दोष आहे. मणक्यांची झीज जेवढी जास्त,तेवढी लक्षणे जास्त होतात. भारतात यासाठी काही विशेष कारणे आढळतात.

डोक्यावर सतत भार वाहणारे गट – हमाल, माथाडी कामगार, रस्त्यावर खडी-दगड वाहणारे मजूर, वर्षानुवर्षे डोक्यावर पाण्याचे हंडे वाहणा-या स्त्रियांना हा आजार लवकर गाठतो.

शिवाय वयोमानाप्रमाणे मणक्यांची झीज होतच असते.

 

 

लक्षणे

मानदुखी, मान जड होणे, मानेत कळा येणे, कवटीच्या तळाशी मानेत दुखणे.

पाठीच्या फ-यांमध्ये दुखणे (कण्याच्या दोन्ही बाजूला फ-याच्या पातळीत दुखणे)

खांद्याच्या भागात दुखणे.

डोकेदुखी – मागे सुरु होऊन डोक्याच्या वर पसरते.

चेतातंतूंवर दबाव आल्याने पुढील लक्षणे दिसतात: पाठीचा चौकोन, खांदा, दंडाचा पुढील भाग, मनगटाचा भाग, अंगठा, इ. ठिकाणी वेदना जाणवते. हे सर्व भाग मानेच्या मणक्यातून निघणा-या चेतातंतूंशी संबंधित आहेत. या भागातले स्नायू पुढे दुबळे होत जातात. चेतातंतू हाडांच्या-गुठळयांनी दाबले-रगडले जाणे हे त्याचे कारण आहे. काही जणांना मान पुढे वाकवल्यावर विजेचा झटका हातापर्यंत चमकतो.

याच भागात मुंग्या येतात. टोचल्याप्रमाणे संवेदना होतात.

कूर्चा चेतारज्जूवर दाबल्यामुळे विशिष्ट लक्षणे दिसतात. हाता-पायात दुबळेपणा जाणवतो, शक्ती कमी होते. लघवी, गुदद्वाराचे नियंत्रण कमी होते. अर्थातच हा आजार आता जास्त झालेला असतो.

मणक्याजवळच्या रक्तवाहिनीवर दाब आल्याने काही लक्षणे दिसतात. यात मुख्यत: चक्कर (मेंदूकडे रक्त कमी पडल्याने) हे लक्षण असते. चक्कर तात्पुरती किंवा सतत येते. चक्कर येण्याचे आणखी एक कारण म्हणजे मानेभोवतीच्या स्नायू व पडद्यांचा सतत ताण हे असते.

रोगनिदान

वरील लक्षणांवरून रोगाची शंका घेणे शक्य आहे. पुढील निदान व सल्ल्यासाठी डॉक्टरकडे पाठवावे. मानेचा क्ष किरण फोटो काढून आजाराचे प्रमाण निश्चित करता येते. आवश्यक वाटल्यास जास्त तपासण्या कराव्या लागतील. (उदा. सीटी स्कॅन किंवा एम.आर.आय.)

 

 

उपचार

सौम्य किंवा मध्यम आजार असल्यास साध्या उपायांनी याची लक्षणे कमी होतात. (पण मूळ आजार बरा होत नाही) यासाठी

मानेखाली कमी रुंदीची मऊ उशी घ्यावी. यामुळे मान नेहमीपेक्षा उलटबाजूला वाकून तिला विश्रांती मिळते.

पुढे वाकण्याचे, मान खाली करण्याचे प्रसंग टाळावेत. काम करताना मान ताठ किंवा मागे वाकलेली चांगली. यासाठी टेबलावर काम करताना उतरती फळी वापरावी. (पूर्वीचे दिवाणजींचे मेज चांगले)

मानेला हलका शेक, मसाज यांचा चांगला उपयोग होतो.

मानेचे व्यायाम करून स्नायू बळकट करणे आणि स्नायूबंध/पट्टे ढिले करण्याने वेदना कमी होत जाते.

वेदनेसाठी तात्पुरत्या वेदनाशामक गोळया घ्याव्यात.

प्रवासात मानेचा पट्टा वापरावा. यामुळे मानेला व मणक्यांना धक्के बसत नाहीत.

शरीरात ‘(ऍंटी-ऑक्सिडंट) वाढण्यासाठी चांगला ताजा आहार घ्यावा. प्राणायाम करावा.

तीव्र आजार असल्यास (स्नायू दुबळे होणे, खूप वेदना, शॉक प्रमाणे चमकणे,लघवी-गुदद्वारावरचे नियंत्रण कमी होणे) यासाठी शस्त्रक्रिया लागू शकेल. या शस्त्रक्रियेच्या तंत्रात आता खूपच प्रगती झाली आहे. सूक्ष्म शस्त्रक्रियातंत्राने ‘दुरुस्त्या’ करण्यामुळे मोठी शस्त्रक्रिया टळते. याबद्दल अर्थातच तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.

 

होमिओपथी

मानदुखी मध्ये होमिओपॅथी उपयुक्त असते. अक्षरश: कोणत्याही प्रकारची मानदुखी असो त्यावर निश्चित उपचार शक्य आहेत.

अर्निका,कॅास्टिकम,हायपरिकम,रूटा अशी अगणीत औषध लक्षणांनुसार वापरता येतात.

 

 

या मानदुखीवर काही इलाज घरच्या घरी करता येतात. यातले काही इलाज इतके सोपे आहेत की, त्यांचा औषधापेक्षाही चांगला उपयोग होतो. मेंथॉल आणि कापूर यांचा वापर जास्त उपयुक्त ठरतो. या दोन्हींचे समप्रमाणात मिश्रण करून किंवा दोन्ही उपलब्ध होत नसतील तर त्यापैकी एक बोटावर घेऊन दुखणार्‍या मानेच्या ठिकाणी चोळल्यास त्या भागातला रक्तप्रवाह सुरळीत होऊन मानदुखी कमी होते.

 

लव्हेंडर – लव्हेंडरचा उपयोग फार जुन्या काळापासून औषधी म्हणून केलेला आहे. आता लव्हेंडर ऑईल उपलब्ध झालेले आहे. हे तेल दुखर्‍या जागेवर चोळल्यास मानदुखी कमी होते. आल्याचा उपयोगही असा होऊ शकतो. मात्र आले चोळण्यासाठी न वापरता त्याचा चहा प्यावा किंवा आल्याचा काढा घ्यावा. काही लोक आल्याचा रस काढून तो दुखर्‍या भागावर चोळतात. तोही उपाय चालतो. अर्निका या फुलापासून एक औषध बनवले जाते. ते बाजारात मिळते. तेही मानदुखीवर वापरता येते.

 

योगोपचार:

 

जेवढे कमी तेवढे चांगले’ असे म्हणण्याचे दिवस आता गेले. आज आपल्याला सर्वकाही इतरांपेक्षा अधिक चांगले पाहिजे असते. अधिक चांगले घर, अधिक चांगला पगार, अधिक चांगला दर्जा; आणि अगदी जगसुद्धा अधिक चांगले पाहिजे असते. ही परिपूर्णतेची धडपड आपल्या सगळ्यांना जणू वेड लावीत आहे. यावर तुम्ही म्हणाल, ‘हा तर उत्क्रांतीचा विकासाचा एक भाग आहे!’ परंतु ज्या वेगाने आपण विकास करीत आहोत त्यामुळे आपल्याला आपल्या मानसिक, शारीरिक, भावनिक आरोग्याची फार मोठी किंमत मोजावी लागत आहे.

आपल्या इच्छा या आपल्या गरजा बनल्या आहेत आणि यांचे समाधान करण्याकरिता कामाप्रति बांधील राहावे लागते. कामाच्या ओघात आपण आपल्यावर खूप ताण देतो आणि शरीराला जणू फँक्टरी  बनवून टाकतो. याची पुढची पायरी आहे शरीराची झीज होणे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना एक अतिशय सामान्य दुखणे येते ते म्हणजे मान दुखी.

सरवायकलजिया हे मानदुखीचे वैद्यकीय नाव आहे. अनेक तास सतत एकाच स्थितीत बसून राहणे किंवा रात्री शांत झोप न लागणे आणि व्यायामाचा अभाव ही मानदुखीची काही कारणे आहेत. जर मानदुखीची कारणे इतकी साधी आहेत तर तिच्यावर उपाय का करू नये?

हाच तर मुद्दा आहे! मानेच्या दुखाण्यापासून सुटका मिळवण्यासाठी  सात सोप्या पायऱ्या (योगासने) ज्या करायला अगदी सोप्या आहेत आणि शिवाय तुमच्या दैनंदिन बिझी वेळापत्रकात त्या सहज फिट होतील.  योगाचा सर्वोत्तम भाग हा आहे की योग पाच हजार वर्षांपेक्षा अधिक काळापासून अस्तित्वात आहे आणि त्याचे महत्व अजिबात कमी झालेले नाही.

१. बालासन: जमिनीवर गुडघ्यांवर उभे रहा / गुडघ्यांचा खालचा भाग जमिनीला टेकलेला असावा आणि पायाचे अंगठे एकमेकांना चिकटलेले असावेत. पायांच्या टाचांवर बसावे. हात शरीराच्या बाजूला असावे, श्वास सोडवा आणि तुमच्या शरीराचा कमरेपासून वरचा भाग तुमच्या मांड्यांवर आणा. हळूहळू डोके जमिनीवर टेकवावे. जेवढे शक्य आहे तेवढेच करावे. शरीराला जास्त ताण देऊ नये. तुमचे हात शरीराच्या बाजूला ठेवा आणि हाताचे तळावे आकाशाच्या दिशेला असावेत. या स्थितीत जितका वेळ राहता येईल तितका वेळ राहावे आणि हळूहळू श्वास घेत स्वतःला आधीच्या अवस्थेत उचलून घ्यावे. हातांना मांड्यांवर ठेवावे, तळावे छताच्या दिशेने देवाला शरण जाण्याच्या स्थितीत असावेत. या आसनामुळे मानदुखी व पाठदुखी यापासून आराम तर मिळतोच शिवाय हे आसन तुमच्या मेंदूलासुद्धा शांत करते. हे नितंब, मांड्या आणि घोट्यांना ताणवते आणि तुम्हाला एक बालक झाल्यासारखे वाटते!

२.नटराजासन: जमिनीवर पाठीवरती झोपावे. हळूहळू तुमचा उजवा पाय उचला आणि डाव्या पायावरून आणा.  डावा पाय सरळच ठेवावा आणि उजवा पाय जमिनीशी काटकोनात आहे याची खात्री करावी. दोन्ही हात दोन्ही दिशेने फैलावे आणि तोंड उजव्या दिशेने वळवावे. या स्थितीत तीस सेकंदे रहावे आणि काही दीर्घ श्वास घ्यावेत. हे डाव्या पायाने पुन्हा करावे.

३.बितीली आसन किंवा गाईप्रमाणे आसन: गुडघ्यांचा खालचा भाग जमिनीवर ठेवावा आणि उर्वरित शरीर (तुमच्या मांड्या, शरीराचा वरचा भाग आणि हात) याने टेबलाप्रमाणे स्थिती घ्यावी. तुमचे गुडघे तुमच्या नितंबाच्या खाली आहेत याची खात्री करावी आणि हाताची मनगटे, कोपर आणि खांदे एका रेषेत परंतु जमिनीच्या लंबरेषेत असावेत आणि तुमच्या मांड्यासुद्धा. तुमच्या शरीराचा वरचा भाग जमिनीला समांतर असावा. या स्थितीत मध्ये श्वास आत घ्या आणि तुमचे पोट आत घ्या जमिनीच्या दिशेने आणि डोके वरच्या दिशेने उचलावे. या स्थितीत थोडा वेळ रहावे आणि याच्यानंतर (खाली दिलेले) मार्जरासन करावे.

४. मार्जरासन: अनुक्रमे, श्वास सोडा आणि तुमच्या पाठीचा कणा छताच्या दिशेने गोलाकार करा आणि तुमचे डोके आतील दिशेने वळवा. तुमची हनुवटी हळुवारपणे छातीवर टेकवा. ही दोन आसने (गाईप्रमाणे आसन आणि मार्जरासन) श्वास घेताना आणि सोडताना क्रमाक्रमाने करीत राहा. असे केल्याने तुमच्या पाठीचा कणा आणि तुमच्या पोटातील इंद्रिये यांना हळुवार मालिश केल्या जातात आणि सोबत मानदुखीपासूनसुद्धा सुटकारा!

५.विपरीत करणी आसन: हे आसन एकदम साधे आहे. पाठीवर झोपा आणि तुमचे पाय एकदम सरळ भिंतीला टेकवा. पायाचे तळावे छताच्या दिशेने असावे आणि पाय भिंतीला टेकलेले. हात शरीराच्या बाजूला असावे आणि हाताचे तळावे वरच्या दिशेने. किमान १५ दीर्घ खोल श्वास घ्या आणि सोडा आणि त्यानंतर पुढच्या आसनाकडे वळा. या योगासनामुळे मानेची मागची बाजू हळुवारपणे ताणल्या जाते, बारीक पाठदुखीपासून सुटकारा मिळतो आणि थकवा निघून जातो, पेटके येत नाहीत.

६. उत्थित त्रिकोणासन: सरळ ताठ उभे राहावे. आता दोन पायांना एकमेकांपासून जितके लांब नेता येईल तितके लांब न्यावे. सरळ ताठ उभे राहून दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ ठेवावे. श्वास आत घ्या आणि हळूहळू उजव्या बाजूला वाका, तुमचा उजवा हात पायाच्या उजव्या घोट्याला स्पर्श झाला पाहिजे आणि डावा हात वरच्या दिशेला असावा. या स्थितीत असताना तुमच्या डाव्या हातावर दृष्टी ठेवा. या स्थितीत जितका वेळ राहता येईल तितका वेळ रहा. पण लक्षात ठेवा की तुमच्या क्षमतेच्या पलीकडे जाऊन शरीराला ताणू नका. योगाचा उद्देश्य आहे तुमच्या वेदनेपासून तुम्हाला सुटकारा देणे, वेदना वाढविणे नाही.

 

७. शवासन:  हे तर सर्वात सोपे आहे. हे करावयाची सूचना ही आहे की तुम्ही काहीही करू नका! शरीर तटस्थ ठेवण्याची या आसनात आवश्यकता आहे. जमिनीवर आडवे व्हावे, सरळ असावे. तुमची मान आणि पाठ सरळ ठेवा आणि किंचित वेगळेपणाचा अनुभव घ्या. हात शरीराच्या बाजूला असावे, तळावे वरच्या दिशेला असावे. हे योगासनांच्या क्रमातील शेवटचे आसन आहे. स्नायू आणि शरीर संपूर्ण शिथिलीकरण होण्याकरिता या स्थितीत किमान पाच मिनिटे राहावे.

अशा पद्धतीने मानदुखी आटोक्यात ठेवता येते.

dr sonali sarnobat

 belgaum

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.