चंदगड : लेह- श्रीनगर मार्गावरील दराज येथे महिपाळगड (ता. चंदगड) येथील जवान महादेव पांडुरंग तुपारे यांचा बर्फात गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ८ मार्च रोजी घडली. यामुळे चंदगड तालुक्यात शोककळा पसरली आहे.
लेह- श्रीनगर मार्गावर दराज येथे तुफान बर्फवृष्टी झाल्याने बर्फात गुदमरून महादेव यांचा काल (बुधवारी) मृत्यू झाल्याचे वृत्त महादेव यांचे वडील पांडुरंग सैन्यदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दूरध्वनीवरून आज (गुरुवार) सकाळी ८ वाजता दिले. यामुळे तुपारे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. महादेव तुपारे हे १६ कुमाँऊ रेजिमेंटमध्ये उत्तराखंड येथे सैन्यात २००५ साली भरती झाले होते. ते सैन्यात क्लार्क या पदावर कार्यरत होते. ८ मार्च रोजी सेवा बजावत असताना अतिबर्फवृष्टीत ते सापडल्यामुळे त्यांचा गुदमरून मृत्यू झाला असे सांगण्यात आले. लेह-श्रीनगर भागात प्रचंड बर्फवृष्टी होत असल्याने महादेव यांचा पार्थिव पोहचवण्याची शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
देवरवाडी येथील वैजू भोगण यांची मुलगी कृपा यांचेबरोबर २००८ साली महादेव यांचा विवाह झाला होता. त्यांना दोन मुले आहेत. महादेव यांच्या निधनाचे वृत्त समजल्यावर गावावर शोककळा पसरली. लेह-लडाख परिसरातील वातावरणात सुधारणा झाल्यानंतर महादेव यांचा पार्थिव दिल्लीला आणला जाणार आहे. त्यानंतर पुण्याला व नंतर शुक्रवार दि. १० रोजी गावी आणला जाणार आहे.
Trending Now