ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. वयाच्या सतराव्या वर्षी लिखाण करणारे शिरवाडकर यांनी फक्त प्रेमकविताच नाही तर ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ अशी विरश्रीची गीते लिहून मराठीचे वेगळेपण जपले. ‘नटसम्राट’ या महान नाट्यकृतीसाठी त्याना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आणि १९८८ मध्ये त्याना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळवणारे ते दुसरे मराठी साहित्यिक, मराठीचा जागर शिखरावर शिखरावर नेऊन ठेवणारे कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्याची परंपरा जागतिक मराठी परिषदेच्या वतीने सुरु केली.
स्वातंत्र्योत्तर काळात भाषावार प्रांतरचना झाली आणि मराठी भाषेला वैभवाचे दिवस येतील अशी आशा निर्माण झाली, पण ते एक दिवास्वप्न ठरले. महाराष्ट्राच्या राज्यकारभाराची भाषा म्हणून मान्यता मिळाली, पण मातृभाषा असलेली मराठी भाषा आता दुसरी होत आहे. मराठी भाषा ज्ञानभाषा नाही, शिक्षणाची भाषा नाही म्हणून, ती जागतिकीकरणाच्या काळात टिकणारच नाही , अशी चर्चा करीत मग ज्ञानाची भाषा म्हणून इंग्रजीकडे जाण्याचे वेड लागले. यानंतर मग मराठी भाषा दिन साजरा करून तिला जिवंत ठेवण्याचे प्रयत्न सुरु झाले. मराठी मध्यमातून उच्च- शिक्षणाची सोय नसल्याने किंवा व्यावसायिक परीक्षाही मराठीतून देण्याची सोय नसल्यामुळे मराठी माणसाची कोंडी होत आहे. आपली मायबोली मराठीला जनमानसात मानाचे स्थान मिळवून द्यायचे असेल आणि या संपण्याच्या मार्गावर असलेल्या मराठी भाषेला जीवित ठेवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. यासाठी तर महाराष्ट्र दिनाप्रमाणेच मराठी भाषा दिन पाळला जावा यासाठी जागतिक मराठी परिषदेने कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून पाळण्याची परंपरा सुरु झाली.
मूळ लेख सौजन्य : मोहन मेस्री सकाळ बेळगाव