Thursday, January 23, 2025

/

बेळगावच्या केमिकल इंजिनीयरची सेंद्रिय शेती

 belgaum

बेळगाव दि ३१ : सेंद्रीय शेतीचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी अविरत प्रयत्नशील असलेले बेळगावचे अभय मुतालिक देसाई यांनी सुतगट्टी येथील त्यांच्या शेतात उसाला फक्त पाणी देऊन एकरी चाळीस एकर ऊस पिकविण्याची किमया केली आहे . गेल्या दोन वर्षांपासून कोणतेही सेंद्रीय टॉनिकचा देखील त्यांनी वापर केलेला नाही हे विशेष म्हणावे लागेल . त्यांना उसापासून गूळ तयार केल्यावर पंधरा लाख रु नफा मिळतो.

oraganic farmingchemical engneer,oraganic farming

केमिकल इंजिनीयरिंगची पदवी संपादन केलेले देसाई गेल्या बावीस वर्षांपासून सेंद्रीय शेतीत नवनवे प्रयोग करत आहेत . व्हेनिलाची देखील यापूर्वी त्यांनी लागवड केली होती . त्यांच्या कुटुंबाची पन्नास एकर शेती आहे . लहानपणापासून बेळगाव जवळील सुतगट्टी येथील त्यांच्या शेतात त्यांचे बालपण गेल्यामुळे नकळतच त्यांची निसर्गाशी नाळ जुडली . पदवी संपादन केल्यावर त्यांनी वडिलांना सांगितले की मी शेतीच करणार .

त्यांचे वडील रासायनिक शेती करत होते . रासायनिक शेतीचे दुष्परिणाम ध्यानात आल्यावर देसाई यांनी त्यावर उपाय शोधायला प्रारंभ झाला . वरदहळी येथील सेंद्रिय कृषी गुरु राव यांच्याशी त्यांची भेट झाली आणि त्यांना  सेंद्रीय शेतीच शेतकऱ्याचे भविष्य आहे याची जाणीव झाली . आपण सेंद्रीय शेती करताना त्यांनी त्यांच्या संपर्कात येणाऱ्या इतर शेतकऱ्यांना देखील रासायनिक शेतीचे दुष्परिणाम सांगून सेंद्रीय शेतीच शाश्वत शेती आहे याची माहिती दिली . त्यांचा सल्ला पटलेल्यानी सेंद्रीय शेती करण्याचे ठरवले . आज सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा गट तयार करून जनतेला सेंद्रीय उत्पादने थेट शेतातून देण्यात ते यशस्वी झालेत .

सध्या अभय मुतालिक देसाई यांनी दहा एकरमध्ये उसाची लागवड केली असून सुतगट्टी येथील आपल्या शेतातच ऊस गाळण्यासाठी गुऱ्हाळ सुरु केले आहे . सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या ऊसाचे त्यांच्या गुऱ्हाळात गाळप करून कोणतेही रसायन न वापरता सेंद्रीय गुळाची निर्मिती केली जाते . गुळा बरोबरच गुळाचे निरनिराळ्या आकाराचे ग्रॅन्युल्स देखील तयार केले जातात . दरवर्षी गुऱ्हाळ साडेतीन महिने चालते पण यंदा दुष्काळामुळे अडीच महिने गुऱ्हाळ चालणार आहे .

१९८६ पासून पाणी मुबलक असूनही स्प्रिंकलरने पाणी दिले जाते . पूर्वी नऊशे गॅलन एक मिनिटाला या प्रमाणे वीसहून अधिक तास पिकांना पाणी दिले जायचे . पण सेंद्रीय शेती सुरु केल्यापासून १२० गॅलन एक मिनिटाला याप्रमाणे केवळ चार तास पाणी दिले जाते . सेंद्रीय पद्धतीने शेती करायला सुरुवात केल्यापासून शेतात तणाचा देखील त्रास नाहीसा झालाय . त्यामुळे कामगार खर्चात बचत होत आहे . आवश्यक असेल तेव्हा जीवामृत ,सस्यामृत आणि इतर सेंद्रीय टॉनिक स्प्रिंकलरने दिली जातात .

ऊसाची शेती पट्टा पद्धतीने केली जाते . उसामध्ये आंतरपीक म्हणून भाजीपाला घेतला जातो . कमीतकमी पाणी वापरून देखील एकराला चाळीस टन इतका ऊस मिळतो . ऊस काढल्यावर त्याचा पाला शेतात पसरला जातो . हा पाला पसरल्यामुळे पाण्याची गरज तर कमी होतेच शिवाय हा पाला कुजल्यावर त्याचे कंपोस्ट तयार होऊन उसाच्या वाढीसाठी आवश्यक असणारी पोषक मूल्ये देखील मिळतात . तण तर उगवतच नाही शिवाय कामगार देखील कमी लागतात . आपल्या शेतात ते अग्निहोत्र करतात . अग्निहोत्र केल्यामुळे वातावरण शुद्धी होऊन त्याचा पिकांना उपयोग होतो असा त्यांचा अनुभव आहे . अग्निहोत्र केलेल्या भागात शेतातील इतर भागापेक्षा अधिक उत्पन्न मिळते असे मुतालिक देसाई आपला अनुभव सांगतात .

मुतालिक यांच्या गुऱ्हाळात साठ टन गूळ तयार होतो . त्यामध्ये त्यांचा स्वतःचा तीस टन आणि इतरांचा तीस टन असतो . दररोज एक टन गूळ  तयार होतो . एका बॅचला एक टन ऊस लागतो आणि त्यापासून २५० किलो गूळ तयार होतो . गुऱ्हाळात एक किलोच्या छोट्या ढेपी तयार केल्या जातात . गुळाची विक्री करण्यासाठी त्यांना विशेष कष्ट घ्यावे लागत नाहीत . किरकोळ विक्री देखील ठळकवाडी येथील केंद्रात केली जाते . शिवाय अनेक ठिकाणाहून त्यांना मोठ्या ऑर्डर देखील मिळतात . त्यांच्या गुळाचे रिपॅकिंग करून परदेशात देखील पाठवला जातो . कंट्रोल युनियन ऑफ सर्टिफिकेशनतर्फे त्यांना मान्यता मिळाली असून त्यामुळे गूळ शंभर टक्के सेंद्रीय असल्याची ग्राहकाला आणि व्यापाऱ्यांना देखील खात्री पटते .

सेंद्रीय गुळाची विक्री किलोला ऐशी रु . दराने केली जाते . उसाचा उत्पादन खर्च तसेच गुऱ्हाळाचा खर्च आदी सारा खर्च वजा जाऊन एका किलोमागे पन्नास रु . इतका घसघशीत नफा त्यांना आणि त्यांच्या गटातील शेतकऱ्यांना मिळतो . शेतकऱ्यांनी रासायनिक शेतीचा धोका ओळखून सेंद्रीय शेतीकडे वळावे असे ते त्यांना भेटणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला कळकळीने सांगतात.

सौजन्य : विलास अध्यापक ( ए बी पी माझा बेळगाव ) .

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.