जग वेगाने बदलत आहे. एकेकाळी १०० टक्के शेतीवर अवलंबून असणारा मराठा समाज आता आपला मोर्चा मोठ्या प्रमाणात व्यवसाय, नोकरी आणि इतर क्षेत्रांकडे वळवत आहे. विविध क्षेत्रांत आपले पाय रोवू पाहत असताना, नव्या क्षेत्रात प्रवेश करताना अनेक समस्या उभ्या राहतात. दुर्दैवाने, बेळगावच्या मराठा समाजालाही अशा अनेक समस्यांनी ग्रासले आहे आणि समाजाची प्रगती काही प्रमाणात खुंटल्याचे दिसत आहे. बेळगावच्या मराठा समाजाची अधोगतीकडे होणारी वाटचाल, याला नेमके कोण जबाबदार आहे? समाजासमोरच्या नेमक्या समस्या काय आहेत? या समाजाला पुन्हा प्रगतीपथावर नेण्यासाठी काय करणे गरजेचे आहे? या प्रश्नांचा वेध घेणे आज अत्यंत आवश्यक आहे.
‘जागा हो मराठा’ या विशेष लेखमालेतून आम्ही बेळगावच्या मराठा समाजाला भेडसावणाऱ्या या सर्व समस्यांवर प्रकाश टाकून, प्रगतीपथावर जाण्यासाठीचे ठोस उपाय आणि कृतीची दिशा देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
बेळगाव लाईव्ह विशेष 3: बेळगावचा मराठा समाज बहुतांशी छोट्या-मोठ्या उद्योगांवर आणि मजुरीच्या कामांवर अवलंबून आहे. गवंडी काम, फरशी फिटिंग, सेंट्रिंग काम, शेतीत मजूर अशा विविध ठिकाणी श्रमाची कामे करणारा हा समाज आहे. या श्रमातून कमी-अधिक प्रमाणात समाधानकारक पैसा मिळत असला, तरी त्या पैशांचे योग्य नियोजन न केल्यामुळे मोठ्या प्रमाणात मराठा समाज आर्थिक संकटात सापडलेला दिसत आहे.
या समाजातील अनेक कुटुंबांमध्ये पैसा कसा वापरावा याचे योग्य ज्ञान आणि आर्थिक शिस्त नाही. केवळ पैसा येत आहे, पण तो टिकत नाहीये. अनेकदा जत्रा, यात्रा, लग्न, विविध समारंभ, उत्सव यासाठी गरजेपेक्षा जास्त भरमसाट कर्ज काढले जाते. योग्य पद्धतीने त्यांचे नियोजन न करता, हा पैसा क्षणिक सुखासाठी खर्च केला जातो आणि त्यामुळे कर्जाचा डोंगर वाढत जातो. कर्जाचा बोजा वाढत असतानाच, काही तरुण व्यसनाधीनतेच्या आहारी जातात, ज्यामुळे कुटुंबाची आर्थिक बाजू अधिकच कमकुवत होते. कर्जाचे हप्ते वेळेवर न भरल्यामुळे कुटुंबावर मानसिक ताण वाढतो, आर्थिक तंगी जाणवते, कुटुंबाचे संपूर्ण आर्थिक नियोजन कोलमडते आणि एकंदर घराची सामान्य असणारी परिस्थिती बिघडून जाते.

परिणामी, बँकांमध्ये कर्जाचे हप्ते थकल्यामुळे पत कमी होत जाते. एकदा बँकेतील पत कमी झाली की, पुन्हा कायदेशीर मार्गाने कर्ज मिळणे अवघड होते. नेमक्या याच संधीचा फायदा घेऊन सावकार याचप्रमाणे विविध स्त्रोतांच्या माध्यमातून भरमसाट व्याजदराने कर्ज दिले जाते. या अनियंत्रित कर्जाच्या परतफेडीसाठी घरातील दागिने, असलेल्या जमिनी, स्थावर जंगम मालमत्ता आणि वडिलोपार्जित मालमत्ता सावकारांच्या घशात घालण्याचे प्रमाण चिंताजनक पातळीवर वाढले आहे. हे आर्थिक अरिष्ट केवळ व्यक्तीपुरते मर्यादित नसून, संपूर्ण समाजाच्या प्रगतीला मागे खेचत आहे आणि समाजाला अधोगतीकडे नेत आहे.
या सगळ्या संकटाला फाटा देण्यासाठी प्रत्येक मराठा बांधवाने आपल्याकडे येणारा पैसा आणि होणारा खर्च याचा योग्य ताळमेळ घालून त्यासाठी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. यासाठी समाजानेच पुढाकार घेऊन व्यापक जनजागृती आणि समुपदेशन करणे अत्यंत आवश्यक आहे. पैसा कसा वापरावा, आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक रुपयाचे नियोजन कसे करावे, आपल्या मुख्य खर्चासाठी किती पैसा, बचतीसाठी किती पैसा आणि आपल्या इतर खर्चासाठी किती पैसा वापरला पाहिजे याचे नियोजन समाजाने समजावून सांगणे गरजेचे आहे.
याबरोबरच अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्ज काढणे वाईट नाही, परंतु कर्ज वेळेत फेड करणे हे गरजेचे आहे. यासाठी बँकेत पत निर्माण करणे महत्त्वाचे आहे. ही पत निर्माण करण्यासाठी योग्य वेळेत जर कर्जाचे हप्ते फेडले, तर बँकेतून पुढील विकासाच्या योजनेसाठी सहज कर्ज उपलब्ध होणे शक्य आहे. यामुळे वैयक्तिक आणि सामुदायिक आर्थिक स्थर देखील उंचावला जाऊ शकतो. कर्ज काढणे म्हणजे वाईट ही प्रवृत्ती पूर्णपणे चुकीची आहे. कर्ज तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा बँकेत तुमची पत असेल आणि आपली पत कशी वाढवायची, याचे धोरण ठरवणं हे प्रत्येक मराठा समाजातील माणसाचे आद्य कर्तव्य आहे. हे कर्तव्य पूर्ण करण्यासाठीच समाजाकडून मोठ्या प्रमाणावर समुपदेशन आणि जनजागृती करणे आवश्यक आहे.
क्रमशः









