जागा हो मराठा!
बेळगावच्या मराठा समाजाची अधोगतीकडे वाटचाल: याला कोण जबाबदार?
शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि जीवनशैलीतील आव्हानांवर विशेष लेखमालिका
जग वेगाने बदलत आहे. एकेकाळी १०० टक्के शेतीवर अवलंबून असणारा मराठा समाज आता आपला मोर्चा मोठ्या प्रमाणात व्यवसाय, नोकरी आणि इतर क्षेत्रांकडे वळवत आहे. विविध क्षेत्रांत आपले पाय रोवू पाहत असताना, नव्या क्षेत्रात प्रवेश करताना अनेक समस्या उभ्या राहतात. दुर्दैवाने, बेळगावच्या मराठा समाजालाही अशा अनेक समस्यांनी ग्रासले आहे आणि समाजाची प्रगती काही प्रमाणात खुंटल्याचे दिसत आहे. बेळगावच्या मराठा समाजाची अधोगतीकडे होणारी वाटचाल, याला नेमके कोण जबाबदार आहे? समाजासमोरच्या नेमक्या समस्या काय आहेत? या समाजाला पुन्हा प्रगतीपथावर नेण्यासाठी काय करणे गरजेचे आहे? या प्रश्नांचा वेध घेणे आज अत्यंत आवश्यक आहे.
‘जागा हो मराठा’ या विशेष लेखमालेतून आम्ही बेळगावच्या मराठा समाजाला भेडसावणाऱ्या या सर्व समस्यांवर प्रकाश टाकून, प्रगतीपथावर जाण्यासाठीचे ठोस उपाय आणि कृतीची दिशा देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

बेळगाव लाईव्ह विशेष 1 :बेळगावच्या मराठा समाजाची अधोगतीकडे होणारी वाटचाल आणि यासाठी जबाबदार असलेली कारणे शोधताना, समाजाच्या जीवनशैलीचा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवरील वाढलेल्या अवलंबित्वाचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. मराठा समाज अलीकडे मोठ्या प्रमाणात सण, उत्सव, यात्रा आणि जत्रांमध्ये गुंतत चाललेला आहे. यात्रा, जत्रा, विविध उत्सव साजरे करणे यात काहीच चुकीचे नाही; या सर्व गोष्टी मानवी मनाच्या संस्कृतीचा एक भाग आहेत. त्याचबरोबर माणसाला दैनंदिन घाईगडबडीच्या जीवनशैलीतून थोडा विरंगुळाही हवा असतो. पूर्वीच्या पिढीच्या लोकांनी याच उद्देशाने या सर्व गोष्टींची तजवीज करून ठेवली होती, जेणेकरून या निमित्ताने गाठीभेटी व्हाव्यात, आचार-विचारांची देवाणघेवाण व्हावी आणि सुख-दुःखाची विचारपूस व्हावी. मात्र, कालांतराने त्यातून अनेक अनिष्ट प्रथांनी जन्म घेतला. मद्यपानाचे प्रकार वाढू लागले आणि यात्रा-जत्रा यांसारख्या कार्यक्रमांसाठी कर्ज काढून वारेमाप खर्च होऊ लागला.
जग जसे बदलले आहे, तशा जगाच्या परिकल्पनाही बदललेल्या आहेत. स्पर्धा वाढलेली आहे, महागाई वाढलेली आहे. या सर्व आव्हानांसमोर मराठा समाजाला आपला टिकाव करणे थोडे अवघड बनत चालले आहे. एका मागोमाग येणाऱ्या अनेक सण, उत्सव, यात्रा आणि जत्रांमध्ये मराठा समाज व्यस्त राहू लागला आहे. विशेषता तरुण समाज एका-दुसऱ्या दिवसाऐवजी दहा ते पंधरा दिवस अशा उपक्रमांमध्ये व्यस्त राहू लागला. परिणामी नोकरी, व्यवसाय यासह उदरनिर्वाहाच्या साधनांवर याचा थेट परिणाम दिसू लागला आणि यामुळेच प्रथमतः मराठा समाज पिछाडीवर येऊ लागला.







आजही अनेक मराठा कुटुंबांची आर्थिक स्थिती सधन असूनही, खर्चाचे नियोजन नसल्यामुळे आणि वारंवार होणाऱ्या अनावश्यक खर्चामुळे आर्थिक अस्थिरता वाढली आहे. केवळ सामाजिकच नाही, तर वैयक्तिक कार्यक्रमांमध्ये देखील अलीकडे मराठा समाजाचा व्यासंग वाढलेला आहे. छोट्या-छोट्या कार्यक्रमांचे आता ‘इव्हेंट’ होऊ लागले आहेत. बदलत्या काळानुसार सोहळे साजरे करणे, आपली संस्कृती पुढे नेणे गरजेचे आहे; परंतु या सर्वात मराठा समाज आपण भूमीपुत्र असल्याची आपली मूळ ओळख विसरत चालला आहे.
यावरचा उपाय म्हणून, बदलत्या काळानुसार बदललेल्या या सण उत्सवाच्या परिकल्पना आताच्या काळात थोड्या बदलण्याची गरज आहे. आठवडाभर किंवा पंधरा दिवस चालणारे कार्यक्रम एक किंवा दोन दिवसांत आटोपते घेणे आवश्यक आहे. यामुळे खर्चावर नियंत्रण येईल, दैनंदिन व्यवहार सुरळीत चालतील, कर्जाचा डोंगर आणि अनावश्यक खर्च आटोक्यात येतील. पूर्वापार चालत आलेल्या रूढी परंपरा प्रथा वाईट नव्हत्या किंवा नाहीत; परंतु त्या योग्य पद्धतीने पार पाडणे अत्यंत गरजेचे आहे. जर अशा उपक्रमांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात मराठा समाज एकत्र येऊ शकतो, तर एखादे प्रबोधनात्मक कार्य करण्यासाठी मराठा समाज नक्कीच एकत्रित येऊ शकतो आणि याच माध्यमातून मराठा समाजाने एकत्र येऊन प्रगतीपथावर जाणे गरजेचे आहे.
मराठा समाजातील युवकांनी उद्योगधंद्याच्या बाबतीत सुशिक्षित होणे गरजेचे आहे. केवळ योग्य मार्गदर्शन आणि अभ्यासाच्या अभावामुळे अनेक मराठा तरुण उच्च शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये मागे पडत आहेत. तसेच, पारंपारिक व्यवसायावर जास्त अवलंबून न राहता, नवीन उद्योगांमध्ये गुंतवणूक करण्याची आणि योग्य उद्योग प्रशिक्षणाची गरज आहे. आर्थिकदृष्ट्या जर मराठा समाज सुधारला, तर कोणत्याही क्षेत्रात मराठा समाज पिछाडीवर राहणार नाही. याचसाठी विचार मंथन आणि संघटित कार्यामुळे तरुण पिढीला त्यांच्या समस्यांवर मार्गदर्शन आणि योग्य व्यासपीठ मिळेल, हे नक्की…!
क्रमशः


