बेळगाव लाईव्ह :सांबरा येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेच्या स्थापनेला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शाळेचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव अपूर्व उत्साहात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात शाळेच्या सभागृहात आयोजित बैठकीत ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत महोत्सव यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्ष लक्ष्मण जोई होते. यावेळी महोत्सवाच्या आयोजनासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. पुढील बैठकीत महोत्सवाची तारीख, कार्यक्रमांची रूपरेषा निश्चित करण्यासह विविध समित्यांची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीत उपस्थित मान्यवरांनी आपले विचार मांडताना राजकीय पक्षभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकोप्याने आणि एकजुटीने हा ऐतिहासिक सोहळा साजरा करण्याचे आवाहन केले. शाळेची पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करणे, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन करणे तसेच शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याबाबतही चर्चा झाली.
शाळेने शिक्षण दिलेल्या सर्व शिक्षकांचा सन्मान करण्याबरोबरच परगावी असलेल्या माजी विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांना महोत्सवासाठी निमंत्रित करण्याचे ठरविण्यात आले. महोत्सवाच्या आयोजनासाठी देण्यात येणारी प्रत्येक जबाबदारी बॅचनुसार पार पाडण्याची ग्वाही अनेक माजी विद्यार्थ्यांनी दिली.
येत्या रविवारी सकाळी १० ते ११ या वेळेत गावकरी आणि माजी विद्यार्थ्यांची पुढील बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले.

यावेळी अरुण डूमरकी, मोहन जोई, मारुती यड्डी, मारुती जोगानी, महादेव अष्टेकर, शिवाजी जोगानी, शंकर कलखांबकर, सिद्राई गिरमल, महेश जत्राटी, मारुती नागन्नावर, मोहन अष्टेकर आदींनी मनोगत व्यक्त केले. यल्लाप्पा हरजी यांनी प्रास्ताविक केले, तर आभारही मानले.
बैठकीला मारुती चिंगळी, कल्लाप्पा पालकर, मोहन हरजी, अनिल चौगले, अशोक लोहार, तानाजी कलखांबकर, कृष्णा सुळेभावी, कृष्णा जोई, भुजंग गिरमल, दीपेश हवालदार, दीपक जाधव, एकनाथ सावगावकर, परशराम अचरेकर, विठ्ठल जोई, नारायण अप्पायचे, नागेश जत्राटी, महेश चिंगळी, गोपी पालकर, भावकांना सुनगार, सिद्धाप्पा हरजी, नर्सिंग गुरव, प्रवीण कारेकर, निखिल चिंगळी, उमेश मास्तमर्डी, अजय सुतार, सुभाष पालकर, मदन देसाई, शिवाजी अप्पायचे, शिवाजी चिंगळी, सोमनाथ पिंगट, सोमनाथ हरजी, यल्लेशी कांबळे, शिवाजी मालाई, लक्ष्मण जत्राटी, जोतिबा मुतगेकर, वासुदेव अचरेकर, सुरज सावगावकर यांच्यासह शंभरहून अधिक माजी विद्यार्थी उपस्थित होते.
दीडशे वर्षांची शैक्षणिक परंपरा जपणाऱ्या या शाळेचा ऐतिहासिक महोत्सव संस्मरणीय करण्यासाठी सांबरा ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थी एकवटले आहेत.




