बेळगाव लाईव्ह | बेळगाव
बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये २ आणि ३ नोव्हेंबर २०२६ रोजी डिफेन्स सिक्युरिटी कॉर्प्स (DSC) भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मेळाव्यात सैनिक जनरल ड्युटी (Soldier GD) आणि सैनिक लिपिक (Soldier Clerk – SD) या पदांसाठी पुनर्नियुक्तीची संधी उपलब्ध होणार आहे.
ही भरती केवळ मराठा लाईट इन्फंट्रीच्या नियमित लष्करी सेवेतून निवृत्त झालेल्या माजी सैनिकांसाठी तसेच मराठा लाईट इन्फंट्रीशी संबंधित टेरिटोरियल आर्मी (TA) कर्मचाऱ्यांसाठी आहे.
सैनिक जनरल ड्युटी पदासाठी उमेदवाराची निवृत्तीपासून दोन वर्षांच्या आत पुनर्नियुक्ती होणे आवश्यक असून, भरतीच्या दिवशी वय ४६ वर्षांपेक्षा कमी असावे. तर सैनिक लिपिक (SD) पदासाठी निवृत्तीपासून पाच वर्षांच्या आत पुनर्नियुक्ती होणे आवश्यक असून, उमेदवाराचे वय ४८ वर्षांपेक्षा कमी असावे.
या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी २ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजता मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, बेळगाव येथे हजर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
भरतीसंदर्भातील अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, बेळगाव येथे संपर्क साधावा.





