बेळगाव लाईव्ह :बाळेकुंद्री खुर्द येथील जाधव परिवाराच्यावतीने अधिक मासानिमित्त रविवार दि. 7 जून रोजी नामसंकीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी प्रतीपंढरपूरचा देखावा साकारण्यात येत असून भव्य सभामंटप उभारण्यात येत आहे.
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज श्रीगुरु पुंडलिक महाराज देहूकर यांच्या उपस्थितीत नामसंकीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
लक्ष्मी नगर, बाळेकुंदी खुर्द (ता. बेळगाव) येथे या सोहळ्यासाठी भव्य सभामंटप उभारण्यात येत आहे. पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरासारखा देखावा उभारण्यात येत आहे. रविवारी सायंकाळी 6 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.

श्रीगुरु पुंडलिक महाराज देहूकर यांचे कीर्तन आणि प्रवचन होईल. रात्री 9 वा. महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होईल. यावेळी उपस्थित वारकऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या धार्मिक कार्यक्रमानिमित्त ‘रील’ बनवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विजेत्यांना रोख आणि आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
इच्छुकांनी विक्रम सोनजी (मो.8147330400)यांच्याकडे नाव नोंदणी करावी असे कळवण्यात आले आहे. पंचक्रोशीतील वारकरी आणि भाविकांनी बहूसंख्येने उपस्थित राहून सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी ग्रा. पं. अध्यक्ष प्रशांत अनंतराव जाधव, भाजपा नेते युवराज जाधव, जाधव डेवलपर्सचे ह.भ.प. शिवराज जाधव यांनी केले आहे.




