बेळगाव लाईव्ह: महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न हा गेल्या अनेक दशकांपासून महाराष्ट्र एकीकरण समिती आणि राष्ट्रीय पक्ष यांच्यातील संघर्षाचा केंद्रबिंदू राहिला आहे. मात्र आता या प्रश्नाला नवे राजकीय वळण मिळाले असून बेळगाव महापालिकेत सीमा ठरावाच्या मुद्द्यावरून भाजप आणि काँग्रेस हे दोन राष्ट्रीय पक्ष थेट आमनेसामने उभे ठाकले आहेत. विशेष म्हणजे, या वाढत्या राजकीय संघर्षात महाराष्ट्र एकीकरण समितीने मात्र संयमाची भूमिका स्वीकारत न्यायालयीन लढाईवर भर दिल्याचे चित्र आहे.
महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या मते, बेळगाव कर्नाटक राज्याचा भाग असताना सीमाप्रश्नावर स्वतंत्र ठराव मांडण्याची गरज नाही. त्यामुळे या विषयावर सभागृहात चर्चा घडवून आणण्याबाबत भाजप सावध भूमिका घेत आहे. दुसरीकडे काँग्रेसने सीमाप्रश्नावर महापालिकेची स्पष्ट भूमिका नोंदवली जावी, यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे.
कन्नड संघटनांनी सीमा ठरावासाठी दबाव वाढविलेला असतानाच भाजपचे आमदार तथा माजी मंत्री भालचंद्र जारकीहोळी आणि राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी स्वतंत्र ठरावाची आवश्यकता काय, असा प्रश्न उपस्थित केल्याने या वादाला नवे परिमाण मिळाले आहे. त्यामुळे कन्नड संघटनांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दुसरीकडे काँग्रेसने या मुद्द्यावर पुढाकार घेतला आहे. सरकार नियुक्त नगरसेवक रमेश सोनटक्के यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सीमा ठरावाचा मुद्दा उपस्थित केला होता.
त्यानंतर पालकमंत्री सतीश जारकीहोळी, आमदार असिफ सेठ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातही चर्चा झाली. मात्र ठराव मांडायचा की नाही, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.
राजकीय निरीक्षकांच्या मते, सीमाप्रश्न हा आता केवळ भावनिक किंवा भाषिक मुद्दा राहिलेला नसून तो स्थानिक राजकारणातील नवे रणांगण बनत आहे. ठराव मांडल्यास एक संदेश जाईल, तर न मांडल्यास दुसरा राजकीय अर्थ निघू शकतो. त्यामुळे दोन्ही राष्ट्रीय पक्ष या मुद्द्यावर राजकीय गणिते मांडताना दिसत आहेत.
दरम्यान, महाराष्ट्र एकीकरण समितीने या राजकीय संघर्षापासून काहीसे अंतर राखले आहे. सीमाप्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने न्यायालयीन प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करणे आणि खटल्यासाठी पाठपुरावा करणे, हीच समितीची प्राथमिकता असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे महापालिकेतील राजकीय धुरळ्यापासून दूर राहून समितीने ‘वेट अँड वॉच’ची भूमिका स्वीकारल्याचे चित्र आहे.




