बेळगाव लाईव्ह :चौथ्या रेल्वे गेट अंडर पास ब्रिजच्या ठिकाणी आजपासून रस्त्याचे काम हाती घेण्यात आले असले तरी वीज वाहिन्या, विजेचे खांब आणि साईड गटारींची व्यवस्था करण्यापूर्वीच हे काम हाती घेण्यात आल्यामुळे नाराजी व्यक्त होत असून सदर कामे आधी करावीत अशी मागणी केली जात आहे.
चौथ्या रेल्वे गेट अंडर पास ब्रिजच्या ठिकाणी अनगोळच्या बाजूने आज मंगळवार सकाळपासून रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. अंडर ब्रिजच्या ठिकाणी निर्माण केल्या जाणाऱ्या सेवा रस्त्यासंदर्भात (सर्व्हिस रोड) स्थानिक रहिवासी दुकानदार व व्यावसायिकांनी यापूर्वी महानगरपालिकेला एक विनंती अर्ज सादर केला होता.
त्यामध्ये संभाव्य गैरसोय आणि निर्माण होणाऱ्या समस्या टाळण्यासाठी रस्त्याचे काम हाती घेण्यापूर्वी वीज वाहिन्या, विजेचे खांब स्थलांतरित करण्याबरोबरच साईड गटारींची व्यवस्था केली जावी अशी विनंती करण्यात आली होती.

तसे न केल्यास पावसाळ्यामध्ये आजूबाजूच्या रहिवाशांना होऊ शकणारा त्रास, निर्माण होणाऱ्या समस्या आणि गैरसोयीची माहिती महापालिकेच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. तथापी सदर विनंती अर्ज करूनही आतापर्यंत तेथील वीज वाहिन्या, विजेचे खांब आणि साईड गटारी यांची व्यवस्था न करता कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत असून ताबडतोब वीज वाहिन्या, विजेचे खांब आणि साईड गटारींची व्यवस्था करावी, अशी मागणी केली जात आहे.





