बेळगाव लाईव्ह :राज्यातील इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकातून वगळण्यात आलेला पिढ्यान पिढ्या प्रेरणा स्त्रोत राहिलेला मराठा साम्राज्याचा नकाशा पुन्हा अभ्यासक्रमाच्या राष्ट्रीय नकाशात तात्काळ समाविष्ट केला जावा. अन्यथा मोर्चा काढून आंदोलन छेडले जाईल, असा इशारा बेळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (शरद पवार गट) दिला आहे.
शरद पवार गटातच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून एका जाहीर व्हिडिओच्या माध्यमातून हा इशारा देण्यात आला आहे. एनसीईआरटी समितीने इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळला आहे.
देशाच्या नकाशात अधोरेखित करण्यात आलेला हा नकाशा अभ्यासक्रमातून वगळणे म्हणजे पिढ्यानपिढ्या प्रेरणास्रोत राहिलेल्या आपल्या भारतीय ऐतिहासिक साहसाला पुसून टाकण्यासारखे आहे.
ही गुन्हेगारी बाब नसली तरी यामुळे देशाची प्रतिष्ठा पुसली जात आहे. यावरून नकली हिंदुत्ववाद्यांच्या सत्ता काळामध्ये असली इतिहास पुसण्याचा प्रयत्न होत आहे असे वाटते. तेव्हा नकाशा वगळण्याच्या या प्रकरणाकडे जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे. सदर बाब एनसीईआरटी समितीच्या निदर्शनास आणावी.

तसेच, ठळकपणे दर्शवलेला नकाशा पाठ्यपुस्तकाच्या राष्ट्रीय नकाशात समाविष्ट करावा, जेणेकरून हे प्रकरण राष्ट्रीय मुद्दा बनणार नाही आणि त्याचे जातीय आंदोलनात रूपांतर होणार नाही.
अन्यथा हा मुद्दा सांप्रदायिक रंग घेऊ शकतो, जे देशासाठी नुकसानकारक ठरू शकते असे सांगून त्यामुळे आमच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून तात्काळ अंमलबजावणी केली जावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस मोर्चाच्या स्वरूपात आंदोलन छेडले, असे त्या पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले.





