बेळगाव लाईव्ह : कर्नाटक सरकारच्या कोविड-१९ लॉकडाऊन आदेशाचे उल्लंघन करून जुगार खेळत असल्याच्या प्रकरणात मन्नूर (ता. बेळगाव) येथील आठ आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. हा निकाल येथील चौथे जेएमएफसी न्यायालयाने दिला.
या प्रकरणातील आरोपींमध्ये विनायक परशराम सांबरेकर, निखिल लक्ष्मण चौगले, नितीन अशोक चौगले, सुनील उर्फ लक्ष्मण अप्पाजी चौगले, विनायक शंकर चौगले, लक्ष्मण देवाप्पा तरळे, मल्लाप्पा बाबू पावशे आणि भरमा उर्फ विशाल शंकर नाईक (सर्व रा. मन्नूर, ता. बेळगाव) यांचा समावेश होता.
काकती पोलीस ठाण्याचे पीएसआय अविनाश अशोक यरगोप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. २२ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मन्नूरजवळील डायट कॉलेज परिसरात सार्वजनिक ठिकाणी आरोपी लॉकडाऊनचे नियम धाब्यावर बसवून अंदरबहार जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर काकती पोलिसांनी धाड टाकली होती. यावेळी आरोपी रंगेहात सापडल्याचा दावा करण्यात आला होता.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी ३२ इस्पेटची पाने, ७,१७० रुपये रोख रक्कम आणि एक प्लास्टिक तट्ट जप्त केला होता. या प्रकरणी आरोपींवर केपीडीपी कायदा कलम २७ तसेच कर्नाटक एपिडेमिक डिसीज अॅक्ट २०२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढील तपासानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
मात्र, न्यायालयीन सुनावणीदरम्यान साक्षीदारांच्या जबाबांमध्ये विसंगती आढळून आल्याने आणि सबळ पुराव्याचा अभाव असल्याने न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
या प्रकरणात आरोपींच्या वतीने अॅड. मारुती कामानाचे आणि अॅड. सचिन मासेकर यांनी काम पाहिले.





