बेळगाव लाईव्ह “मी भाजपमध्ये प्रवेश करणार” असे सांगणारेच लवकरच जेडीएसमध्ये सामील होतील,” असा परोक्ष टोला अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी गोकाकचे भाजप आमदार रमेश जारकीहोळी यांना लगावला आहे.बेळगाव येथील शासकीय विश्रामगृहात रविवारी पत्रकारांशी बोलताना सवदी यांनी राजकीय घडामोडींवर स्पष्ट भूमिका मांडली.
“काम नसलेलेच अशा प्रकारच्या चर्चा करतात. अशा वक्तव्यांना आम्ही फारसे महत्त्व देत नाही,” असे ते म्हणाले.“अशा चर्चा करणारेच प्रत्यक्षात दुसऱ्या पक्षात जाण्याच्या विचारात असतात,” असे सांगत त्यांनी जारकीहोळींवर अप्रत्यक्ष टीका केली.“मी आयुष्यभर काँग्रेसमध्येच राहणार आहे. अर्थहीन वक्तव्यांना उत्तर देण्याची गरज नाही. माझ्याकडे माझ्या मतदारसंघाच्या विकासाचे मोठे काम आहे,” असेही सवदी यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, “मी भाजपमध्ये गेलो तर मला घेतले जाणार नाही,” असे रमेश जारकीहोळी म्हणत असतील, तर तेच लवकरच जेडीएसमध्ये जातील, असा सूचक इशाराही सवदी यांनी दिला.या वक्तव्यामुळे कर्नाटकातील राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.





