बेळगाव लाईव्ह : मल्लिकार्जुननगर, बेळगाव येथे सार्वजनिक ठिकाणी हेरॉईन या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोघा जणांना काल मार्केट पोलिसांनी अटक करून त्यांच्या जवळील 7000 रुपये किमतीचे हेरॉईन जप्त केले.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे मोहम्मदशहीद अब्दुलहमीद मुल्ला (वय 31, रा. आंबेडकरनगर, काकती बेळगाव) आणि शकूर अब्दुल खान (वय 27, रा. अंजुमनगर बेळगाव) अशी आहेत हे दोघे मल्लिकार्जुननगर येथील श्री रेणुका मंदिराजवळ सार्वजनिक ठिकाणी हेरॉईन या अंमली पदार्थाची विक्री करत होते. त्यावेळी मार्केट पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हुसेनसाब केरुर व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाड टाकून दोघाही आरोपींना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्या जवळील 7000 रुपये किमतीचे 6.95 ग्रॅम हेरॉईन जप्त केले. पोलीस चौकशीत जप्त केलेले हेरॉईन आपण रुक्मिणीनगर येथील तब्रेज बसापुरी आणि अरबाज मुस्ताक नागनूरी यांच्याकडून आणल्याची माहिती आरोपीने दिली. त्यामुळे सदर चौघाजणांविरुद्ध मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.
गांजा सेवन केलेले दोघे उद्यमबाग पोलिसांच्या ताब्यात
राणी चन्नम्मानगर येथे सार्वजनिक ठिकाणी गांजाच्या नशेत अनैसर्गिक वर्तन करणाऱ्या दोघा युवकांना उद्यमबाग पोलिसांनी काल अटक केली.
अटक झालेल्या आरोपींची नावे निखिल मंडलिक मादीगर (वय 26, रा. जैतन माळ उद्यमबाग बेळगाव) आणि राहुल अमृत कोलकार (वय 32, रा. राणी चन्नम्मानगर बेळगाव) अशी आहेत. हे दोघेही काल बुधवारी चन्नम्मानगर येथील श्री महालक्ष्मी मंदिराजवळ सार्वजनिक ठिकाणी अनैसर्गिक वर्तन करत असल्याचे उद्यमबाग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पी. जे. गंडवगोळ व त्यांच्या सहकाऱ्यांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी करतेवेळी त्यांनी कोणती तरी नशा केल्याचे दिसून आले. तेंव्हा त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता दोघाही आरोपींनी गांजा या अंमली पदार्थाचे सेवन केल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी उद्यमबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
दोघे मटका बुकी शहापूर, ग्रामीण पोलिसांकडून गजाआड
बेळगाव शहरातील देवांगनगर आणि चन्नम्मानगर येथे लोकांचे पैसे मटका जुगारावर लावणाऱ्या दोघा मटका बुकिंना पोलिसांनी काल अटक केली.
संजू आडवेप्पा तलवारी (वय 28, रा. मार्कंडेयनगर, निंगेनट्टी बेळगाव) आणि राजू भगवंत बागडी (वय 51, रा. लक्ष्मीनगर, वडगाव बेळगाव) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यापैकी संजू हा कमलनगर, काटगाळी रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी लोकांचे पैसे कल्याण मटका या जुगारावर लावत होता. त्यावेळी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोष दळवाई व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाड टाकून आरोपीला रंगेहात पकडले. तसेच त्याच्या जवळील जुगाराचे साहित्य जप्त केले. दुसऱ्या प्रकरणात राजू हा देवांगनगर चौथा क्रॉस नजीक सार्वजनिक ठिकाणी लोकांचे पैसे मुंबई मटका या जुगारावर लावत होता.
त्यावेळी शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मनीकंठ पुजारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाड टाकून आरोपीला ताब्यात घेण्याबरोबरच त्याच्या जवळील जुगाराचे साहित्य जप्त केले. पोलीस चौकशीत राजू याने जुगारात गोळा केलेले पैसे आपण दुसरा आरोपी तहसीलदार गल्ली बेळगाव येथील किशन पाटील याच्याकडे जमा करत असल्याची माहिती दिली. त्यामुळे दोन्ही आरोपींविरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.





