बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील हलगा गावातील प्रगतिशील शेतकरी व देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धाकलु फकिरा बिळगोजी (वय ८८) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने हलगा परिसरात शोककळा पसरली असून धार्मिक व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
गेल्या साठ वर्षांहून अधिक काळ ते हलगा येथील हजरत बीबी फातिमा दर्ग्याचे मुख्य सेवक म्हणून कार्यरत होते. विविध धर्मीय भाविकांच्या समस्या संयमाने ऐकून त्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. सामाजिक व धार्मिक सलोखा कसा जपावा, याचे ते जिवंत उदाहरण मानले जात होते. हलगा पंचक्रोशीत धार्मिक सहिष्णु व समन्वयवादी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती.
देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारीने काम पाहिले. गावातील धार्मिक उत्सव, सामाजिक उपक्रम आणि सामुदायिक कार्यक्रमांमध्ये ते नेहमीच पुढाकार घेत असत. सर्व समाजघटकांना एकत्र आणण्याची त्यांची भूमिका उल्लेखनीय होती.

त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली, दोन विवाहित मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी १ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
धाकलु बिळगोजी यांच्या जाण्याने हलगा गावाने सामाजिक सलोख्याचा एक आधारवड गमावला आहे, अशी भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.





