बेळगाव लाईव्ह:
बेळगाव शहरा जवळील सांबरा विमानतळ परिसरात ड्रोन उडविण्यावर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) विमानतळाभोवतीचा ०८ किलोमीटरचा परिसर यापूर्वीच ‘रेड झोन’ म्हणून घोषित केला आहे.
या अनुषंगाने विमानतळाभोवतीच्या ०८ किमी परिसरात (रेड झोन/यलो झोन) कोणत्याही प्रकारचे ड्रोन किंवा मानवरहित हवाई वाहन (यूएव्ही) उडविण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, नियमांचे काटेकोर पालन करावे. संबंधित आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर विद्यमान कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
बेळगाव विमानतळ परिसरातील सुरक्षेला प्राधान्य देत नागरिकांनी अनधिकृत ड्रोन उड्डाण टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.






