बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील जैन समाजातर्फे महावीर जयंती निमित्त आज मंगळवारपासून येत्या सोमवार दि. 30 मार्च 2026 पर्यंत भगवान महावीर जन्म कल्याण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून दरवर्षीप्रमाणे भरगच्च कार्यक्रमांनी आठवडाभर हा महोत्सव साजरा केला जाणार आहे, अशी माहिती जैन समाजाच्या मध्यवर्ती उत्सव समिती बेळगावचे सदस्य माजी आमदार संजय पाटील यांनी दिली
बेळगाव शहरातील कन्नड साहित्य भवन येथे आज मंगळवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. माजी आमदार संजय पाटील यांनी सांगितले की, गेली 28 वर्षे बेळगाव भागामध्ये जैन समाजाच्यावतीने भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सव आम्ही सकल जैन समाज म्हणून आमच्या सर्व उपजाती एकत्र येऊन साजरा करतो. आयकर आयुक्त नरेंद्र जैन यांनी 28 वर्षांपूर्वी आमच्या समाजाला एकत्र करून हा कार्यक्रम सुरू केला आणि ती परंपरा आम्ही अतिशय श्रद्धाभक्तीने पुढे सुरू ठेवली आहे. आम्ही प्रत्येक वर्षी महावीर कल्याणकाचे कार्यक्रम आठवडाभर आयोजित करत असतो.
त्यानुसार यावर्षी आजपासून रक्तदान शिबिर, जैन समाजाचा अन्न महोत्सव, महिलांची मोटर बाईक रॅली, सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. त्यानंतर येत्या 30 मार्च रोजी सकाळी 8 वाजता शहरातील टिळक चौक येथून महावीर कल्याण शोभायात्रा काढली जाईल, जी महावीर भवन येथे समाप्त होईल. तत्पूर्वी 29 मार्च रोजी होणाऱ्या महत्त्वाच्या कार्यक्रमाला जैन समाजाचे देशातील मोठे नेते पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया हे उपस्थित राहणार आहेत.
तसेच अभिमानाने सांगावेसे वाटते की बेळगाव व कर्नाटकाचे भूषण असलेले भारत सरकारकडून पद्मश्री किताबाने सन्मानित झालेले डॉ. प्रभाकर कोरे यांचा जाहीर सत्कार आम्ही जैन समाजातर्फे करणार आहोत. राज्यपाल कटारिया यांच्या हस्ते महावीर भवन येथे 29 रोजी सकाळी 11 वाजता हा सत्कार सोहळा होणार आहे. याच दिवशी सकाळी 9:30 वाजता आमच्या महिला वर्गाकडून मागील वर्षापेक्षा भव्य अशी मोटरसायकल रॅली काढली जाणार आहे.
या रॅलीचे उद्घाटन राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांच्या पत्नींच्या हस्ते होईल. एकंदर या पद्धतीने महावीर कल्याण महोत्सवानिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे असे सांगून आमचा जैन समाज हा पाण्याप्रमाणे आहे जो कशामध्येही मिसळून जातो. त्यानुसार सर्व जाती-धर्मामध्ये मिसळण्याची आमची परंपरा असून त्यांना देखील आमच्या या महोत्सवात आम्ही सहभागी करून घेत असतो.
तरी सर्व धर्मीयांनी भगवान महावीरांच्या या महोत्सवामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन तो यशस्वी करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन माजी आमदार संजय पाटील यांनी शेवटी केले. पत्रकार परिषदेस बेळगावातील जैन समाजाचे नेते व प्रमुख मंडळी उपस्थित होती.





