belgaum

येळ्ळूर येथे भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव; बंदोबस्ताची मागणी

0
44
Yellur gp
 belgaum

बेळगाव लाईव्ह :येळ्ळूर (ता. जि. बेळगाव) गावामध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे गावकरी त्रस्त झाले आहेत. या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका म्हशीचे रेडकू जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली असून नागरिक, विशेषत: शालेय मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायतीने गावातील भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

येळ्ळूर गावामध्ये अलीकडे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून कळपाने फिरणारी ही कुत्री दहशत निर्माण करू लागली आहेत. या कुत्र्यांच्या हल्ल्यात गावातील आप्पाजी कुगजी यांच्या म्हशीचे रेडकु जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. उपद्रवी भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्ताबाबत अलीकडे ग्रामपंचायतीला निवेदन ही सादर करण्यात आले होते.

तथापि त्याकडे दुर्लक्ष करून आजपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. सकाळी फिरायला जाणाऱ्या एका माणसावर जवळपास 20 ते 25 कुत्र्यांनी हल्ला चढवल्याची घटना यापूर्वी घडली आहे.

सुदैवाने आसपास उपस्थित असलेल्या नागरिकांमुळे तो इसम कुत्र्यांच्या हल्ल्यातून बचावला होता. विशेष करून दररोज शाळेला जाणाऱ्या विद्यार्थीवर्गाला या कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत असून भीतीने जीव मुठीत धरून त्यांना शाळेला ये-जा करावी लागत आहे.

Yellur gp

गावच्या खाली असलेल्या स्मशान भूमिमध्ये त्या कुत्र्यांचे मोठे कळप बसलेले असतात. तेथच जवळ लहान मुलांची अंगणवाडी, समिती शाळा, चांगळेश्वरी शाळा आणि महाराष्ट्र हायस्कूल आहे. भटकी कुत्री अंगावर धावून येत असल्यामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांना रोज येता-जाता या कुत्र्यांच्या दहशतीखाली वावरावे लागत आहे.

ही भटकी कुत्री विशेषत: रात्रीच्या वेळी पादचारी नागरिक अथवा दुचाकी वाहन चालकांच्या अंगावर धावून जाण्याचे, त्यांच्यावर हल्ला करण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. तरी एखादी गंभीर घटना घडण्याची वाट न पाहता येळ्ळूर ग्रामपंचायतीने युद्धपातळीवर उपाययोजना करून गावातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी त्रस्त संतप्त गावकऱ्यांकडून केली जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.