बेळगाव लाईव्ह : शिवजयंतीचे औचित्य साधून सांबरा येथे विद्यार्थ्यांसाठी स्व-रक्षण तसेच आणीबाणीच्या परिस्थितीत घ्यावयाच्या खबरदारीबाबत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिवमुद्रा युवा मंच यांच्या वतीने भैरीदेव मंदिराच्या आवारात आयोजित या शिबिरात सरकारी मराठी व कन्नड प्राथमिक शाळा तसेच हायस्कूलमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती शशिकला जाधव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. तसेच युवा उद्योजक सामाजिक कार्यकर्ते शिवराज जाधव, देवस्थान समितीचे अध्यक्ष राजू देसाई आणि माजी जि. पं. सदस्य नागेश देसाई यांच्या हस्ते श्री भैरीदेव यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.
श्रीमती शशिकला जाधव यांनी खानापूर भागातील आपल्या सेवाकाळातील अनुभव कथन करत विद्यार्थ्यांना शिक्षण आणि अभ्यासाचे महत्त्व पटवून दिले. पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर यांनी आणीबाणीच्या प्रसंगी स्व-रक्षणासह घ्यावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती दिली. अपहरण, चोरी यांसारख्या संशयास्पद घटना आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन त्यांनी केले.

गॅस गळतीबाबत मार्गदर्शन करताना चंद्रकांत हिंडलगेकर यांनी मुख्य विद्युत स्विच बंद करणे, सिलेंडरचा रेग्युलेटर किंवा पाईपलाईनचा व्हॉल्व्ह त्वरित बंद करणे, घरातील सर्व खिडक्या-दारे उघडी ठेवून हवा खेळती ठेवणे, लाईटचे स्विच, मॅचबॉक्स किंवा लाईटर न वापरणे आदी महत्त्वाच्या सूचना दिल्या. गॅसचा वास तीव्र असल्यास तात्काळ घराबाहेर पडावे, असेही त्यांनी सांगितले.
हेस्कॉमचे अधिकारी एस. बी. चेट्टी यांनी वीज गळती झाल्यास मेन स्विच (एमसीबी) बंद करावा, ओल्या हाताने प्लग किंवा वायरला स्पर्श करू नये आणि विद्युत आगीवर पाणी न टाकता कोरड्या वाळूचा वापर करावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ व भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत उपाध्यक्ष मारुती जोगाणी, पीडीओ सिद्धलिंग सरूर, मल्लाप्पा कांबळे, कल्लाप्पा पालकर, शीतल तीप्पान्नाचे, गजानन पाटील, पुंडलिक जत्राटी, मोहन हरजी, महेश कुलकर्णी, सपना तळवार, रंजना अप्पायाचे, राजू कांबळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, एसडीएमसी सदस्य, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाय. के. धर्मोजी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य विक्रम सोनाजी, सुधीर इरोजी, किरण धर्मोजी, सुरज जत्राटी, सोमनाथ सावगावकर, सुनील हणमाई आणि सोमनाथ अकनोजी यांनी विशेष परिश्रम घेतले.




