बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी दलित आमदारांच्या सद्यस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. अहिंद समुदायातील सदस्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी यावेळी केला.
शिरहट्टीचे आमदार चंद्रा लमाणी यांच्यावर झालेल्या लोकायुक्त कारवाईचा संदर्भ देत जारकीहोळी म्हणाले की, लोकायुक्त संस्थेबद्दल मला आदर आहे, मात्र एका सुशिक्षित दलित नेत्याला त्याच समाजातील व्यक्तींचा वापर करून जाणीवपूर्वक गोवण्यात आले आहे. जर कोणी चूक केली असेल तर त्याला नक्कीच शिक्षा व्हावी, पण खोट्या कटात अडकवून नेत्यांची कारकीर्द उद्ध्वस्त करू नये, असे रमेश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.
गेल्या २० वर्षांपासून दलित आमदारांचे खच्चीकरण केले जात असून, आता त्याविरोधात बोलण्याची वेळ आली आहे. निवृत्तीच्या दिवशीच अधिकाऱ्यांवर होणाऱ्या धाडी संशयास्पद वाटतात. केवळ दलित आणि अहिंद समुदायाचेच नेते अशा प्रकरणांत का अडकतात, असा प्रश्न रमेश जारकीहोळी यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे केवळ कुरुबा समाजाचे नसून संपूर्ण अहिंद समुदायाचे नेते आहेत. त्यांनी दलित आमदारांची भेट घेऊन या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी सुनिश्चित करावी. सिद्धरामय्या पूर्वीसारखे राहिलेले नाहीत, अशी टिप्पणीही रमेश जारकीहोळी यांनी आपल्या मंत्रिमंडळातील जुन्या आठवणींना उजाळा देताना केली.
भाजपमधील अंतर्गत वादावर बोलताना जारकीहोळी यांनी पक्षाला सावध केले. नेत्यांनी आपापसातील मतभेद तातडीने सोडवले पाहिजेत, अन्यथा भविष्यात पक्षाचे मोठे नुकसान होईल. काँग्रेसमध्ये सतीश जारकीहोळी यांनीही अशाच प्रकारे अंतर्गत सुधारणेची मागणी केली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले. स्वतः न्यायालयीन प्रकरणाचा बळी असल्याचे सांगत त्यांनी सविस्तर भाष्य करणे टाळले, मात्र निष्पक्ष चौकशीची मागणी लावून धरली.




