बेळगाव लाईव्ह : मैदानावर सामना पाहण्यासाठी जमलेल्या हजारो प्रेक्षकांच्या साथीने बेळगावच्या ऐतिहासिक सरदार मैदान येथे रंगलेल्या मुरगेंद्र गौडा पाटील क्रिकेट ट्रॉफी 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पांडुरंग सीसी नागरमुनवळी संघाने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. साईराज वॉरियर्स संघाचा पराभव करत पांडुरंग सीसीने सलग तिसऱ्यांदा यंदाच्या बेळगाव शहरातील तिसरी मोठी ट्रॉफी जिंकत विजयी हॅट्रिक पूर्ण केली.
दोन इनिंगमध्ये रंगला थरारक अंतिम सामना
अंतिम सामना दोन इनिंगमध्ये खेळविण्यात आला. पहिल्या इनिंगमध्ये साईराज वॉरियर्सने पहिल्या 10 षटकांत 138 धावांची भक्कम मजल मारली. प्रत्युत्तरादाखल पांडुरंग सीसी संघाने 139 धावा करत आघाडी घेतली.
दुसऱ्या इनिंगमध्ये साईराज वॉरियर्सने 10 षटकांत 88 धावा केल्या. 87 धावांचे लक्ष्य गाठताना पांडुरंग सीसीने 9 व्या षटकात 4 गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य पूर्ण करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
विश्लेषण आणि संघरचना
डॉ. विनायक कुंभार आणि युवराज जाधव यांच्या नेतृत्वाखालील पांडुरंग सीसी संघाने उत्कृष्ट संघभावना आणि संतुलित खेळाचे प्रदर्शन केले. विशेष म्हणजे, दोन्ही संघांतील जवळपास 21 खेळाडू परराज्यातील होते, यामुळे स्पर्धेची पातळी अधिक उंचावली.
साईराज चषक आणि कवठगीमठ कप जिंकल्यानंतर आता मुरगेंद्र गौडा चषकावरही पांडुरंग सीसीने आपले नाव कोरले आहे.

बक्षीस वितरण सोहळा
मुरगेंद्र गौडा पाटील क्रिकेट ट्रॉफीचे बक्षीस वितरण भाजप नेते मुरगेंद्र गौडा पाटील खासदार जगदीश शेट्टर आणि डीसीसी बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांच्या हस्ते पार पडले.
फगरे यांच्या मालकीचा साईराज वॉरियर्स संघ उपविजेता ठरला, तर शिवराज जाधव आणि विनायक कुंभार यांच्या मालकीचा पांडुरंग सीसी संघ विजेता ठरला.
वैयक्तिक पुरस्कार विजेते
• 🏏 उत्कृष्ट फलंदाज : एजाज कुरेशी (पांडुरंग सीसी)
• 🌟 सामनावीर : एजाज कुरेशी (पांडुरंग सीसी)
• 🎯 उत्कृष्ट गोलंदाज : साहिल लोंगे (साईराज वॉरियर्स)
• 🏍️ मॅन ऑफ द सीरिज (एक्सेस दुचाकी) : ओमकार केनी (साईराज वॉरियर्स)
स्पर्धेतील उच्च दर्जाच्या खेळामुळे क्रिकेटप्रेमींना सरदार मैदानावर एक रोमांचक अनुभव मिळाला.



