belgaum

धोकादायक स्पीड ब्रेकरचे झाले मार्किंग;

0
395
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील धोकादायक आणि अनमार्क स्पीड ब्रेकरमुळे घडलेल्या अपघातानंतर अखेर प्रशासन जागे झाले असून स्पीड ब्रेकरवर पांढऱ्या पट्ट्यांचे मार्किंग करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. प्रशासन आणि पोलीस खात्याच्या संयुक्त उपक्रमातून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली.

काँग्रेस रोड, मराठा कॉलनी क्रॉस येथील स्पीड ब्रेकरवर सर्वप्रथम पांढऱ्या पट्ट्यांचे मार्किंग करण्यात आले. या ठिकाणी यापूर्वी अपघात घडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत होता.
कॉंग्रेस रोडवरील अनमार्क स्पीड ब्रेकरमुळे शिवाजीनगर बेळगाव येथील रहिवासी ६४ वर्षीय सौ. सरिता कालकुंद्रीकर यांचा अपघाती मृत्यू झाला होता. दुचाकी वर मागे बसलेले असताना स्पीड ब्रेकर न दिसल्याने त्या गाडीवरून खाली कोसळल्या होत्या आणि डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता.

विविध माध्यमांनी तसेच बेळगाव लाईव्हने या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवला होता. वृत्त प्रसारित होताच पोलीस खात्याने तात्काळ दखल घेत कारवाई सुरू केली.


पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी स्वतः काँग्रेस रोडवरील स्पीड ब्रेकरची पाहणी करून अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. अपघात टाळण्यासाठी आणि वाहनचालकांना स्पीड ब्रेकर लांबूनच दिसावा यासाठी पांढऱ्या रंगाचे स्पष्ट पट्टे मारले जात आहेत.
बेळगाव शहरातील सर्व स्पीड ब्रेकरना टप्प्याटप्प्याने मार्किंग करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून लवकरच ही मोहीम संपूर्ण शहरभर राबविण्यात येणार आहे.


अपघातानंतर सुरू झालेल्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असले तरी, अशा घटना घडल्यानंतरच प्रशासन हालचाल करते, अशी टीकाही होत आहे. तरीही, भविष्यात कोणताही अपघात होऊ नये यासाठी ही उपाययोजना महत्त्वाची ठरणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.