बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या मध्यवर्ती बस स्थानकावर प्रवाशांचे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा मार्केट पोलिसांनी छडा लावला आहे. या कारवाईत पोलिसांनी ११ लाख २५ हजार रुपये किमतीचे १७६ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले असून दोन महिला आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकात प्रवाशांच्या दागिन्यांची चोरी झाल्याच्या तक्रारी मार्केट पोलीस स्थानकात दाखल झाल्या होत्या. या प्रकरणांचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त आणि एसीपी संतोष सत्यनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केट पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते.
या पथकाने तपास चक्रे फिरवून आरती ऊर्फ फरीदा शिवा चौगुले (२६) आणि सरस्वती संतोष रोखडे (४५, दोन्ही रा. वड्डरवाडी, बेळगाव) या दोन महिलांना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत या महिलांनी २०२४ या वर्षात बस स्थानकावर चार वेळा चोऱ्या केल्याची कबुली दिली.
या टोळीची कार्यपद्धती अत्यंत नियोजनबद्ध होती. चोरी केलेले सोन्याचे दागिने मुख्य आरोपी आरतीचा पती शिवा रामू चौगुले याच्याकडे दिले जात असत.

शिवा हे दागिने वितळवून रामलिंगखिंड गल्लीतील ‘एचडीबी फायनान्स’मध्ये स्वतःच्या नावावर गहाण ठेवत असे आणि त्यावर पैसे उचलत असे. पोलिसांनी फायनान्स कंपनीतून १७6 ग्रॅम वजनाचे ११.२५ लाख रुपये किमतीचे वितळवलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या प्रकरणात शिवा चौगुले हा सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस आयुक्त आणि पोलीस उपआयुक्तांनी निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची, पीएसआय विठ्ठल हावन्नवर, एस. एम. शिंदे आणि संपूर्ण पथकाचे विशेष कौतुक केले आहे.





