बेळगाव लाईव्ह :वारंवार तक्रार करूनही शाळेतील शिक्षकांच्या कमतरतेकडे दुर्लक्ष केले जात असल्याच्या निषेधार्थ विद्यार्थी व पालकांनी गावातील मराठी शाळेसमोर आंदोलन केल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी धामणे कुरबरहट्टी येथे घडली. तसेच जोपर्यंत ज्यादा शिक्षकांची नियुक्ती होत नाही तोपर्यंत, किमान येत्या सोमवारपर्यंत टाळे ठोकून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शाळेच्या एसडीएमसी समितीने घेतला आहे.
बेळगाव तालुक्यातील धामणे कुरबरहट्टी येथील इयत्ता 1ली ते 5 वीपर्यंत वर्ग असलेल्या सरकारी मराठी प्राथमिक शाळेमध्ये मराठी व कन्नड विषयाचे असे फक्त दोनच शिक्षक आहेत. शाळेची पटसंख्या 27 असली तरी दोघेच असल्यामुळे कार्यालयीन कामासह मुलांना शिकवणे अशी दोन्ही कामे करण्याची कसरत त्या शिक्षकांना करावी लागत असते.
याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर होत असल्यामुळे शाळेची शाळा सुधारणा समिती (एसडीएमसी) गेल्या तब्बल दीड वर्षापासून शिक्षण खात्याकडे सातत्याने ज्यादा शिक्षकांची मागणी करत असली तरी त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अलीकडेच गटशिक्षणाधिकाऱ्यांनी या शाळेला दिलेल्या भेटी प्रसंगी दोनच शिक्षक इतक्या मुलांना कसे काय शिकवतात? अशी विचारणा करून आश्चर्य व्यक्त केले होते. तसेच शाळेमध्ये त्वरेने आणखी एका शिक्षकाची नियुक्ती करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र अद्यापपर्यंत त्याची पूर्तता झालेली नाही.
या संदर्भात विचारणा केली असता ज्यादा शिक्षक देता येणार नाही असे सांगून गटशिक्षणाधिकाऱ्यांनी आपला शब्द फिरवल्यामुळे एसडीएमसी सदस्य व पालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. शाळेच्या पटसंख्येमुळे ज्यादा शिक्षक देता येत नसेल तर आसपासच्या कांही गावातील शाळांमध्ये अवघ्या सतरा -अठरा मुलांसाठी तीन -तीन शिक्षक आहेत त्याचे काय? असा सवाल धामणे कुरबरहट्टी मराठी शाळेच्या एसटीएमसी सदस्यांकडून केला जात आहे.
ज्यादा शिक्षक नेमणुकीच्या बाबतीत गेल्या दीड वर्षापासून केले जाणारे दुर्लक्ष आणि खुद्द गटशिक्षणाधिकारी आपला शब्द फिरवत असल्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी आज शुक्रवारी सकाळी आपल्या पाल्यांसह शाळेसमोर निदर्शने करत आंदोलन केले. दरम्यान शाळेच्या एसटीएमसी समितीने देखील जोपर्यंत जादाच्या शिक्षकाची नेमणूक होत नाही, तोपर्यंत किमान येत्या सोमवारपर्यंत टाळे ठोकून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार आज टाळे ठोकून शाळा बंद करण्यात आली आहे. ही सर्व परिस्थिती आणि मुलांचे शैक्षणिक भवितव्य लक्षात घेता आता शिक्षण खाते कोणता निर्णय घेणार? याकडे धामणे कुरबरहट्टी येथील गावकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.




