बेळगाव लाईव्ह: लोकमान्य ग्रंथालय प्रणित बुक लव्हर्स क्लबच्या साप्ताहिक कार्यक्रमात ज्येष्ठ कवी बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या कवितांवर आधारित बहारदार काव्यसंध्या रंगली. “हिरवे हिरवे गार गालिचे…”, “आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे…”, “गर्द सभोती रान साजणी तू तर चाफेकळी…” अशा ओळींनी वातावरण मंत्रमुग्ध झाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. सौ. आश्विनी वैद्य यांनी प्रास्ताविक, स्वागत व पाहुण्यांचा परिचय करून दिला.
या कार्यक्रमात सौ. सुनीता पाटणकर आणि डॉ. रश्मी फडके यांनी बालकवींच्या निवडक कवितांचे सस्वर सादरीकरण केले. बालकवींचे आयुष्य अवघ्या अठ्ठावीस वर्षांचे असले तरी त्यांच्या साहित्यसंपदेतून निसर्गप्रेम, बालमनावरील प्रेम आणि शब्दांवरील अपार श्रद्धा प्रत्ययास येते, असे त्यांनी नमूद केले. “आयुष्य लहान पण कार्य महान” असे म्हणत त्यांनी बालकवींच्या काव्यातील वात्सल्य, प्रेम आणि आध्यात्मिक स्पर्श अधोरेखित केला.

‘औदुंबर’सारख्या रचनांमधून त्यांच्या कवितेला लाभलेला आध्यात्मिक आयाम स्पष्ट होतो. त्यांचे कौतुक रेव्हरंड टिळक यांनी भरभरून केले होते आणि त्यांचा सहवासही बालकवींना लाभला होता, अशी माहिती वक्त्यांनी दिली.
‘संध्या रजनी’, ‘फुलराणी’, ‘तारकांचे गाणे’ यांसह विविध कवितांचे सादरीकरण करत त्यांनी श्रोत्यांची दाद मिळवली. बालकवींची प्रतिभा ही ईश्वरदत्त संपत्तीच होती, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
या काव्यसंध्येला साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


