बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र–कर्नाटक सीमावादासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या दावा क्रमांक 04/2004 बाबत तात्काळ उच्चाधिकार समितीची बैठक बोलावावी, तसेच सीमाप्रश्नी महाराष्ट्राच्या भूमिकेविरोधात भूमिका घेणाऱ्या पदाधिकाऱ्यांना निलंबित करावे, अशी जोरदार मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
2004 साली महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र–कर्नाटक सीमावादासंदर्भात दावा क्रमांक 04/2004 सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे. या प्रकरणी येत्या 21 जानेवारी 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने यापूर्वीही महाराष्ट्र सरकारशी अनेक वेळा पत्रव्यवहार केला असून, या सुनावणीपूर्वी उच्चाधिकार समितीची बैठक घेऊन सखोल चर्चा करावी, तसेच सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या बाजूने प्रभावी मांडणीसाठी वरिष्ठ वकील, साक्षीदार व इतर बाबींविषयी ठोस रणनीती ठरवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यापूर्वी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती तसेच सीमाभागातील नागरिकांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदने देण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे सीमा प्रश्नासाठी नेमलेल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष व खासदार धैर्यशील माने यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून उच्चाधिकार समितीच्या बैठकीसंदर्भात विचारणा केली आहे.

दरम्यान, कर्नाटक सरकार या विषयावर सातत्याने आक्रमक भूमिका घेत असताना, गेल्या वर्षभरात महाराष्ट्र सरकारकडून सीमाप्रश्नी कोणतीही ठोस भूमिका दिसून आलेली नाही. बेळगावसह सीमाभागात मराठी भाषिकांवर होत असलेले भाषिक अत्याचार सहन करत सीमावासीय संघर्ष करत आहेत. त्यामुळे उच्चाधिकार समितीची तात्काळ बैठक बोलावून या विषयावर सविस्तर चर्चा करावी व सीमावासीयांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच काल बेळगाव येथे शिवसेना (शिंदे गट) मधील काही तथाकथित कर्नाटकी पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन सीमाप्रश्नी व मराठी भाषिकांच्या विरोधात भूमिका घेतल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन संबंधित पदाधिकाऱ्यांना तात्काळ पदावरून निलंबित करावे, अशी जोरदार मागणी युवा समिती सीमाभागच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या बाबतची माहिती खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक आणि आमदार चंद्रदीप नरके यांनाही देण्यात आली आहे.
यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंदरे, उपाध्यक्ष नारायण मुचंडिकर, निपणीचे लक्ष्मीकांत पाटील, अशोक घगवे आदी उपस्थित होते.




