बेळगाव लाईव्ह : निपाणी तालुक्यातील पडलीहाळ येथील राजवीर विशाल शिंदे या चार वर्षीय बालकाचे श्रवणयंत्र बेळगाव-निपाणी बस प्रवासादरम्यान हरवले आहे. जन्मजात मूकबधिर असलेल्या राजवीरवर शासकीय मदतीतून शस्त्रक्रिया करून हे यंत्र बसवण्यात आले होते.
पडलीहाळ येथील रहिवासी राजवीर शिंदे हा जन्मजात मूकबधिर असल्याने त्याला ऐकण्याची क्षमता नव्हती. कर्नाटक सरकार आणि जिल्हा रुग्णालयाच्या विशेष सहकार्याने या बालकावर मोठी शस्त्रक्रिया पार पडली होती.
या उपचारांतर्गत त्याच्या डोक्याच्या आत ‘हियरिंग इंप्लांट’ बसवण्यात आले असून, त्याला साहाय्यक म्हणून बाहेरून ‘साउंड प्रोसेसर’ हे यंत्र लावण्यात आले होते. या उपचारांसाठी त्याला महिन्यातून १२ वेळा जिल्हा रुग्णालयात जावे लागते.

दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास निपाणी-बेळगाव मार्गावर धावणाऱ्या केएसआरटीसी बेळगाव डेपोच्या बसमधून प्रवास करताना राजवीरचे बाहेरील श्रवणयंत्र हरवले. या यंत्राशिवाय राजवीरला ऐकू येणे अशक्य आहे.
सदर श्रवणयंत्र कोणाला सापडल्यास ९५९१५५५२०९, ८८८४८३८४८२ किंवा ९५९१९३५३५४ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, अशी विनंती विशाल शिंदे यांनी केली आहे.





