belgaum

आकाशाला गवसणी घालणारी सिद्धी काविलकर

0
471
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव येथील सिद्धी धनंजय काविलकर या तरुणीने लहानपणीच्या गंभीर आरोग्य समस्येवर जिद्दीने मात करत, पुरुषांचे वर्चस्व असलेल्या वैमानिक क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे. कठोर परिश्रम, अचूक नियोजन आणि कुटुंबीयांच्या भक्कम पाठिंब्याच्या बळावर तिने अमेरिकेतून व्यावसायिक वैमानिक (Commercial Pilot License – CPL) परवाना मिळवत, आपल्या कर्तृत्वाने बेळगावचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवले आहे.

सिद्धी काविलकर या धनंजय काविलकर आणि डॉ. रुपाली काविलकर यांची कन्या, तर शंकरराव काविलकर आणि प्रकाश दोड्डणावर यांची नात आहेत. त्यांचे वडील ‘रुची ब्रेड’ या उद्योगाचे मालक आहेत. सिद्धीचे शालेय शिक्षण डिव्हाईन प्रॉव्हिडन्स हायस्कूल, टिळकवाडी येथे झाले आणि तिने जीएसएस कॉलेजमधून बारावी पूर्ण केली. विशेष म्हणजे, शालेय जीवनापासूनच ती गणित आणि भौतिकशास्त्र या विषयात नेहमी पूर्ण गुण मिळवून अव्वल राहिली होती.

बारावीनंतर, वैद्यकीय आणि इतर प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊनही सिद्धीने डॉक्टर किंवा इंजिनियर न होता पायलट प्रशिक्षण घेण्याचा धाडसी निर्णय घेतला. हा निर्णय तिच्यासाठी एका मोठ्या संघर्षाची सुरुवात होता. ३ वर्षांची असताना सिद्धीला सतत तीव्र डोकेदुखीचा त्रास होता आणि दृष्टी तपासणीनंतर तिला चष्मा देण्यात आला होता. वैमानिक होण्यासाठी दृष्टी निकोप असणे अनिवार्य असते. या आव्हानाचा सामना करण्यासाठी सिद्धीने जिद्द सोडली नाही. वैमानिक बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने अनेक वर्षे सातत्यपूर्ण व्यायाम, योग्य आहार आणि वैद्यकीय उपचार घेतले. तिच्या अथक प्रयत्नांमुळे तिची दृष्टी सुधारली आणि अखेरीस तिने वैमानिक प्रशिक्षणासाठी लागणाऱ्या सर्व वैद्यकीय चाचण्या यशस्वीरित्या पार पाडल्या.

 belgaum

जून २०२३ मध्ये, तिने अमेरिकेतील ट्रेजर कोस्ट ट्रेनिंग स्कूल, स्टुअर्ट, मियामी, फ्लोरिडा येथे आपले वैमानिक प्रशिक्षण सुरू केले. यासोबतच, तिने एम्ब्री-रिडल युनिव्हर्सिटी, फ्लोरिडा येथून एरोनॉटिक्स आणि एव्हिएशनमध्ये बॅचलर्स पदवीचे शिक्षणही समांतरपणे सुरू ठेवले. ऑक्टोबर २०२५ मध्ये तिने फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन हे प्रशिक्षण किमान वेळेत पूर्ण केले. विशेष म्हणजे, तिने आपल्या सर्व लेखी परीक्षांमध्ये पूर्ण गुण मिळवत, वैमानिक प्रशिक्षणाच्या क्षेत्रात आपली क्षमता सिद्ध केली. पदवीचे शिक्षण घेत असतानाच, भविष्यात वैमानिकांना प्रशिक्षण देणारी प्रशिक्षक बनण्याची तिची महत्त्वाकांक्षा आहे.

आपल्या प्रवासाविषयी बोलताना सिद्धी काविलकर म्हणते, “भारतात वाढताना, वैमानिक बनण्याचे माझे स्वप्न मी कॉकपिटमध्ये पाऊल ठेवण्यापूर्वीच सुरू झाले होते… हे असे क्षेत्र आहे, जिथे महिलांचा सहभाग आजही कमी आहे आणि जिथे प्रत्येक पाऊल पुढे टाकण्यासाठी दृढनिश्चय लागतो.

मी वैमानिकांच्या कुटुंबातून आलेली नाही, तरीही कौशल्ये, शिस्त आणि अथक प्रयत्नातून हे सिद्ध केले की, उत्कृष्टतेचे कोणतेही लिंग नसते. हा प्रवास केवळ माझ्या कुटुंबाच्या भक्कम पाठिंब्यामुळे शक्य झाला. माझा हा प्रवास प्रत्येक तरुण मुलीला सांगतो की, हे आकाश ते लोक अडवू शकत नाहीत, जे त्यावर नियंत्रण ठेवू पाहतात. ते आकाश त्यांचे आहे, जे विमानाचा ताबा घेण्याची आणि आपला मार्ग स्वतःहून निश्चित करण्याची हिंमत ठेवतात.”

सिद्धी काविलकर यांचा हा प्रवास केवळ यशोगाथा नाही, तर तो जिद्द, मेहनत आणि आत्मनिर्भरता यांचा आदर्श आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.