बेळगाव लाईव्ह :बेळगावच्या बीम्स हॉस्पिटल आवारामध्ये सुरू केलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलवर खर्च केले जाणारे कोट्यावधी रुपये लक्षात घेता सरकारने हे हॉस्पिटल कंत्राटी डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीने न चालवता कायमस्वरूपी डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून चालवावे, अशी मागणी आम आदमी पक्षाच्या बेळगाव जिल्हा शाखेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
आम आदमी पक्षाच्या (आप) बेळगाव जिल्हा शाखेतर्फे आज सोमवारी सुवर्ण विधानसौध समोर धरणे आंदोलन करून उपरोक्त मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यात आले. आपल्या मागणी संदर्भात प्रसिद्धी माध्यमांना माहिती देताना आपचे बेळगाव जिल्हा अध्यक्ष विजय पाटील यांनी सांगितले की, बेळगावमध्ये सरकारने सुमारे 200 कोटी रुपये खर्च करून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारले आहे. गेल्या दोन-तीन वर्षात हे हॉस्पिटल आवश्यक सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधांसह सुसज्ज करण्यात आले आहे.
तथापि या हॉस्पिटलमध्ये सुपर स्पेशालिटी डॉक्टर्सच नाहीत. या हॉस्पिटलसाठी जर आपण केएलई हॉस्पिटल मधील डॉक्टरांची मदत घेण्यात येत असेल तर ते चालणार नाही. खरंतर कर्नाटक सरकारचे वैद्यकीय क्षेत्रासाठी 4 लाख कोटी रुपयांचे बजेट आहे. तेंव्हा बेळगावच्या हॉस्पिटलमध्ये कायमस्वरूपी सुपर स्पेशलिटी डॉक्टराला मासिक 6 लाख रुपये पगार द्यावा लागतो वगैरे कारणे सांगणे हास्यास्पद आहे.
दुसरी गोष्ट या हॉस्पिटलमध्ये उच्च दर्जाचेच डॉक्टर हवेत, त्यांच्या पगाराशी जनतेचा संबंध नाही तो प्रश्न सरकारचा आहे. पुरेसा निधी उपलब्ध असल्यामुळे कर्नाटक सरकारने बेळगावच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कंत्राटी डॉक्टर्स अथवा वैद्यकीय कर्मचारी न आणता कायमस्वरूपी डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली पाहिजे. सध्या बेळगावच्या हॉस्पिटलमध्ये सुधारणा नूतनीकरणाच्या नावाखाली भ्रष्टाचार सुरू आहे.

सध्या हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आवश्यक सर्व साहित्य -यंत्रोपकरणांनी सुसज्ज असल्यामुळे प्रथम ते सुरू करावे आणि नंतर ज्या समस्या आहेत त्या सोडवाव्यात. याव्यतिरिक्त बेळगावचे सिविल हॉस्पिटल अर्थात बीम्स हॉस्पिटल वेगळे आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल वेगळे असे वर्गीकरण न करता दोन्ही हॉस्पिटल एकच मानली जावीत.
या ठिकाणचे अतिदक्षता विभाग वगैरे सर्व गोष्टी एकत्र असल्या पाहिजेत. डॉक्टर आणि त्यांच्या सहाय्यक वैद्यकीय कर्मचाऱ्यांना देखील बिम्सचे वेगळे आणि सुपर स्पेशालिटीचे वेगळे असे विभागले जाऊ नये. सर्वांनी एकत्रितपणे बेळगाव जिल्ह्यातील सुमारे 50 लाख जनतेची सेवा केली पाहिजे, असे जिल्हाध्यक्ष विजय पाटील यांनी स्पष्ट केले याप्रसंगी आम आदमी पक्षाचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


