बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या शहापूर येथील जांगळे कुटुंबाच्या सुनबाई ॲड. ज्योत्स्ना धनवे-जांगळे यांनी धारवाड येथील हायकोर्ट ऑफ कर्नाटक, धारवाड बेंच बार असोसिएशनच्या खजिनदारपदी निवड होत इतिहास घडवला आहे.
बार असोसिएशनच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला वकील या पदावर निवडून आल्या असून, बेळगावसाठी हा विशेष अभिमानाचा क्षण ठरला आहे.
धारवाड बेंच बार असोसिएशनमध्ये यंदा प्रथमच ‘खजिनदार’ हे पद निर्माण करण्यात आले होते. या पहिल्याच निवडणुकीत ॲड. ज्योत्स्ना जांगळे यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत भरघोस मतांनी विजय मिळवला. त्यांच्या या निवडीमुळे बेळगावच्या कायदेशीर क्षेत्राचा नावलौकिक वाढला असून, महिलांसाठीही एक नवा आदर्श निर्माण झाला आहे.

ॲड. ज्योत्स्ना धनवे-जांगळे या अभ्यासू, कर्तव्यदक्ष आणि सामाजिक जाणीव जपणाऱ्या वकील म्हणून ओळखल्या जातात. त्या गणेश पुर गल्ली शहापूर येथील सामाजिक कार्यकर्त्या सुनीता जंगले यांच्या स्नुषा आहेत.
ज्योत्स्ना या गरजू व दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या सातत्याने कार्यरत राहिल्या आहेत. त्यांच्या या ऐतिहासिक यशाबद्दल बेळगाव, शहापूर तसेच धारवाड येथील वकील संघटना, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





