बेळगाव लाईव्ह :बेळगावला भविष्यातील तंत्रज्ञान आणि नवाचार केंद्र (इनोव्हेशन सेंटर) बनवण्याच्या प्रयत्नांना ‘बेळगाव फर्स्ट’च्या माध्यमातून नवी गती मिळाली आहे. ‘बेळगाव फर्स्ट’ हा बेळगाव शहराचा पहिला समर्पित आयटी-बीटी अर्थात माहिती तंत्रज्ञान आणि जैवतंत्रज्ञान समीक्षा कार्यक्रम होता, ज्याचे आयोजन बेळगाव उत्तरचे आमदार असिफ (राजू) सेठ यांनी केले होते.
‘बेळगाव फर्स्ट’ कार्यक्रमाने सरकार, उद्योग आणि शैक्षणिक जगत यांना सामूहिक व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते. जिथे बेळगाव शहराच्या तंत्रज्ञान क्षेत्राच्या रोड मॅपवर अर्थात कार्य मार्गावर चर्चा झाली. बैठकीस राज्याचे आयटी -बीटी खात्याचे मंत्री प्रियांका खर्गे, केओनिक्सचे अध्यक्ष शरथ कुमार बच्चेगौडा आणि आमदार गणेश हुक्केरी उपस्थित होते. यामुळे बेंगळूर पलीकडे कर्नाटकातील माहिती तंत्रज्ञान (आईटी) विकासाच्या विकेंद्रीकरणावरील कर्नाटक सरकारचा नवा दृष्टिकोन अधोरेखित झाला.
कार्यक्रमात बोलताना मंत्री प्रियांक खर्गे यांनी कर्नाटकचा आईटी-बीटी विस्तार फक्त बेंगलोरपर्यंत मर्यादित राहू शकत नाही असे सांगून त्यांनी बेळगाव सारख्या टियर-2 आणि टियर-3 शहरांच्या लक्षित धोरण आणि पायाभूत सुविधांना समर्थन देण्याच्या आवश्यकतेवर जोर दिला. ते म्हणाले की कर्नाटकचा आईटी-बीटी विकास बेंगलोर -केंद्रीत राहू शकत नाही. बेळगाव सारख्या शहरांना देखील त्यांच्या हक्काच्या संधी मिळाल्या पाहिजे.
महत्त्वाचे स्थान, मजबूत शैक्षणिक संस्था आणि पर्याप्त मानव संसाधनं असून देखील बेळगाव दीर्घ काळापासून उपेक्षित राहिले असल्याचे मंत्र्यांनी मान्य केले. तसेच यापूर्वीच्या प्रयत्नांमध्ये काही अडचणी आल्याचे मान्य करून आता यापुढे संबंधित खात्यांमध्ये अधिक चांगला समन्वय राखत या ठिकाणी माहिती तंत्रज्ञान आणि जैवतंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी आवश्यक अंमलबजावणी वेगाने केली जाईल, असे आश्वासन मंत्री खर्गे यांनी दिले.
तसेच बेळगावकडे कौशल्य आणि भौगोलिक लाभ असल्यामुळे आता फक्त अंमलबजावणी आणि समन्वयाची गरज आहे असे सांगून त्यांनी बीटकाच्या कार्याची प्रशंसा करताना ती बेळगावच्या तांत्रिक परिसंस्थेचे प्रतिनिधित्व करणारी संघटना असल्याचे गौरवोद्गार काढले. राज्याचा आयटीबीटी विभाग आणि बीटका यांच्यात औपचारिक सहकार्य निर्माण होण्यासाठी सामंजस्याचा करार करण्याचे संकेतही त्यांनी दिले.

आमदार असिफ सेठ यांनी यावेळी बोलताना माहिती तंत्रज्ञान आणि जैवतंत्रज्ञान पारंगत स्थानिक किंवा पिढीला बेळगाव मध्येच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांच्या कौशल्याला वाव मिळावा या उद्देशाने बेळगाव फर्स्ट कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगितले तसेच बेळगाव येथे लवकरात लवकर आयटी-बीटी औद्योगिक केंद्र सुरू करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली.
बेळगाव फर्स्ट कार्यक्रमांमध्ये माहिती तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित कंपन्या, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षण तज्ज्ञ, आणि बेळगाव मधील तंत्रज्ञान कंपन्यांच्या (बीटका) सदस्यांनी सहभाग घेतला होता.


