बेळगाव लाईव्ह : कित्तूर कर्नाटक (बेळगाव विभाग) भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी ‘कित्तूर कर्नाटक विकास मंडळ’ स्थापन करावे आणि दरवर्षी ५ हजार कोटी रुपयांचा विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नवलगुंदचे आमदार एन. एच. कोनरेड्डी यांनी सर्व आमदारांच्या वतीने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे केली आहे. सुवर्णसौध येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान हे निवेदन सादर करण्यात आले.
ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या बेळगाव विभागातील धारवाड, बेळगाव, गदग, हावेरी, बागलकोट, विजापूर आणि उत्तर कन्नड या जिल्ह्यांच्या प्रगतीसाठी स्वतंत्र मंडळाची गरज असल्याचे आमदार कोनरेड्डी यांनी स्पष्ट केले.
मुंबई कर्नाटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागाचा विकास अद्याप अपेक्षित स्तरावर पोहोचलेला नाही. शिक्षण, आरोग्य आणि साक्षरता यांसारख्या मानवी विकास निर्देशांकात हा भाग पिछाडीवर असून, येथील दरडोई उत्पन्न राज्याच्या सरासरीपेक्षा कमी असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

या भागातील प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी डॉ. नंजुडाप्पा समितीच्या अहवालाचा संदर्भ देत, विशेष आर्थिक पॅकेज आणि मोठ्या उद्योगांच्या निर्मितीची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. कल्याण कर्नाटकच्या धर्तीवर कित्तूर कर्नाटकलाही घटनात्मक संरक्षण आणि विकास मंडळ मिळावे, अशी भावना या भागातील सर्व आमदारांनी पक्षभेद विसरून व्यक्त केली आहे. चालू अधिवेशनातच मुख्यमंत्र्यांनी याबाबतची अधिकृत घोषणा करावी, असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी ज्येष्ठ मंत्री एच. के. पाटील, जी. परमेश्वर, मुख्य प्रतोद अशोक पट्टण आणि मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार बसवराज रायरेड्डी उपस्थित होते.


