बेळगाव लाईव्ह :उत्तर अंतर्गत कर्नाटक प्रदेशात दि. 12 ते दि. 16 डिसेंबर 2025 दरम्यान किमान तापमान सामान्यपेक्षा 4 अंश सेल्सिअस ते 6 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची आणि थंडीची लाट ते तीव्र थंडीच्या लाटेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता राज्याच्या महसूल विभागाशी (आपत्ती व्यवस्थापन) संलग्न असलेल्या कर्नाटक राज्य नैसर्गिक आपत्ती देखरेख केंद्राने वर्तवली आहे.
कर्नाटक राज्य नैसर्गिक आपत्ती देखरेख केंद्राने वर्तविलेल्या अंदाजानुसार 12 ते 17 डिसेंबर 2025 या सहा दिवसांसाठी राज्याच्या किमान तापमानाचा तीव्र हवामान निर्देशांक अंदाजे (स्रोत: ईसीएमडब्ल्यूएफ मॉडेल) पुढील प्रमाणे असणार आहे.
उत्तर अंतर्गत कर्नाटक प्रदेशात दि. 12 ते दि. 16 डिसेंबर 2025 दरम्यान किमान तापमान सामान्यपेक्षा 4 अंश सेल्सिअस ते 6 अंश सेल्सिअसने कमी राहण्याची शक्यता आहे. दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि मलनाड जिल्ह्यांमध्येही दि. 12 ते दि. 16 डिसेंबर 2025 या कालावधीत किमान तापमान सामान्यपेक्षा 4 अंश सेल्सिअस ते 6 अंश सेल्सिअसने घटण्याची शक्यता आहे.
यामुळे उपरोक्त नमूद कालावधीत या प्रदेशातील काही ठिकाणी थंडीची लाट ते तीव्र थंडीच्या लाटेची परिस्थिती निर्माण होऊ शकते. किनारपट्टीच्या कर्नाटकातही दि. 14 ते दि. 16 डिसेंबर 2025 दरम्यान किमान तापमान सामान्यपेक्षा कमी होण्याची शक्यता राज्य नैसर्गिक आपत्ती देखरेख केंद्राने व्यक्त केली असून अंदाजित कालावधी वाढल्यास अंदाजाची अचूकता कमी होऊ शकते, असेही स्पष्ट केले आहे.
उत्तर भारतातील शीतलाटेप्रमाणे बेळगाव जिल्ह्यातील तापमान देखील घसरू लागले आहे. आता पुढील कांही दिवसात वरील प्रमाणे तीव्र थंडीच्या लाटेचा देण्यात आला आहे. बेळगाव शहर आणि परिसरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला असून तापमानात लक्षणीय घट नोंदवली जात आहे.
यावरून बेळगाव ‘गरीबांचे महाबळेश्वर’ म्हणून का सुपरिचित आहे याची प्रचिती येऊ लागली आहे. हुडहुडी भरणारी थंडी पडू लागल्याने घराघरांमध्ये ठेवणीतील उबदार कपडे बाहेर पडू लागले आहेत. थंडीपासून बचाव करण्यासाठी ग्रामीण भागात तसेच शहरातील अनेक वसाहतींमध्ये शेकोट्या पेटू लागल्या आहेत. वाढत्या थंडीचा परिणाम आरोग्यावरही होत असून सर्दी -खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे डॉक्टरांकडून सध्याच्या हिवाळ्याच्या दिवसात आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.


